मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला असून नाशिक, पलूस, शिरूर आणि सिंधुदुर्गसह अनेक भागात वादळी वारे, विजा आणि मुसळधार पावसाने कहर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
नाशिक जिल्ह्यात ढगफुटीचा मारा
नाशिकच्या द्राक्ष नगरी पिंपळगाव बसवंत, वडनेर भैरव परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. द्राक्षाच्या सूक्ष्म घड निर्मिती प्रक्रियेवर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी, यावर्षीच्या द्राक्ष हंगामावर फटका बसणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. काढणीला आलेला कांदा पावसात भिजला असून, अनेक ठिकाणी नेत्रावती नदीला पूर आल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा: सावधान! आशियात कोरोनाची नवी लाट; सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय
पलूस तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी झालेल्या पावसात बागायतदार विलास बापू पोळ यांच्या द्राक्ष बागेवर महाकाय आंब्याचे झाड कोसळले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या भागातही वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
शिरूर तालुक्यात विवाह समारंभात गोंधळ
शिरूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. एका विवाह समारंभादरम्यान जोरदार पावसामुळे डेकोरेशनचे साहित्य खराब झाले. कर्मचाऱ्यांना साहित्य वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. उपस्थितांच्या मदतीने कार्यक्रम पार पडला. यानंतर हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट वाढवला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने १७ मेपर्यंत यलो अलर्ट दिला होता, मात्र आता तो 20 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत वादळी वारे, विजा आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इतर पावसाचे झोन
कोकणात रत्नागिरी, रायगड आणि पालघर भागातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती भागात वादळी वाऱ्यांसह हलकासा पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि हलकासा पाऊस अनुभवास आला.
या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे .