Friday, March 13, 2026 10:02:12 PM

Maharashtra Unseasonal Rain: निसर्गाचा लहरीपणा; उन्हाच्या झळांनंतर अवकाळीचा तांडव; मराठवाड्यात तब्बल 19 हजार हेक्टरवरील पिके मातीमोल

प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले असून शेतकऱ्यांकडून त्वरित नुकसानभरपाईची मागणी होत आहे.

maharashtra unseasonal rain निसर्गाचा लहरीपणा उन्हाच्या झळांनंतर अवकाळीचा तांडव मराठवाड्यात तब्बल 19 हजार हेक्टरवरील पिके मातीमोल

बीड: निसर्गाचा लहरीपणा नेमका काय असतो, याचा प्रत्यय सध्या संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे. एकीकडे अंगाची लाहीलाही करणारा उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच, दुसरीकडे अचानक आकाशातून कोसळणारी अवकाळी आणि गारपिटीची संकटे शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरवत आहेत. 'दुष्काळात तेरावा महिना' या म्हणीचा जणू नवा अर्थच या अस्मानी संकटाने लिहून काढला आहे. मागील आठवडाभरापासून विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाने जो धुमाकूळ घातला आहे, त्याने बळीराजाच्या डोळ्यांतील पाणी मात्र आटवू दिले नाही. हातातोंडाशी आलेला सोन्यासारखा घास निसर्गाने एका झटक्यात हिरावून घेतल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.

या लहरी हवामानाचा सर्वाधिक आणि भीषण फटका मराठवाड्याला बसला आहे. विभागीय आयुक्तालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, मराठवाड्यातील तब्बल 19 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना या अवकाळीने अक्षरशः झोडपून काढले आहे. लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये शेतीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

केवळ शेतीच नाही, तर या अस्मानी संकटाने जिवाचाही बळी घेतला आहे. वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मुक्या जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. निसर्गाच्या या रौद्ररुपापुढे प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी, नुकसानीची व्याप्ती पाहता ही मदत वेळेत पोहोचेल का, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा: Belasis Bridge Opening: दक्षिण मुंबईचा 'लाईफलाईन' रस्ता पुन्हा सक्रिय; 130 वर्षांचा वारसा लाभलेला बेलासिस पूल प्रवाशांच्या सेवेत

बीड जिल्ह्याची अवस्था अधिकच विदारक आहे. बीडमध्ये सुमारे एक हजार 464 हेक्टर बागायती क्षेत्रासोबतच एकूण 3 हजार 409 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात 95 हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झाल्याने फळबागायतदारांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यातही 68 हेक्टरवरील पिकांना या वादळी पावसाने आणि गारपिटीने जोरदार तडाखा दिला आहे. वर्षभर काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेले धान्य डोळ्यांदेखत मातीत मिसळताना पाहण्याचे दुर्दैव आज मराठवाड्यातील बळीराजाच्या वाट्याला आले आहे.

आठवड्याच्या सुरुवातीलाच, म्हणजे सोमवारी मराठवाड्यावर जणू आभाळच फाटले. धाराशिव, लातूर, बीड आणि परभणीसह नांदेड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यातच बीड आणि लातूरमध्ये झालेल्या गारपिटीने तर पिकांची अक्षरशः चाळण केली. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काळ्याकुट्ट ढगांनी दिवसाच अंधार दाटून आणला होता. समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, या एकाच दिवसात 15 हजार 516 हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, यामध्ये 808 हेक्टर बागायती क्षेत्राचा समावेश आहे. तब्बल 136 गावांमधील 23 हजार 104 शेतकऱ्यांचे संसार या अवकाळीने एका रात्रीत उघड्यावर पाडले आहेत.

आज हतबल झालेला शेतकरी उरल्यासुरल्या आशेने सरकारकडे पाहत आहे. हातातोंडाशी आलेला रब्बीचा हंगाम असा अचानक हिरावला गेल्याने बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. आता सर्व मदार सरकारी यंत्रणांवर आहे. प्रशासनाने केवळ पंचनाम्यांचे 'कागदी घोडे' न नाचवता, तातडीने भरीव आर्थिक नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी आर्त हाक बांधावरून दिली जात आहे. निसर्गाच्या या दुष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला आता कोरड्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची आणि भक्कम आधाराची नितांत गरज आहे.

हेही वाचा: Cheque Book Lost: बँकेचं चेकबुक हरवलंय? सेकंदाचाही विलंब नको; लगेच करा 'हे' काम अन्यथा...


सम्बन्धित सामग्री