Maharashtra Weather Update: थंडी, धुके आणि प्रदूषणाचा विळखा; राज्यासाठी हवामान विभागाचा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे

राज्यात थंडीची लाट आणि वाढते वायू प्रदूषण यामुळे हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी इशारा दिला आहे. काही भागांत तापमानात मोठी घट होणार असून, नागरिकांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update: थंडी, धुके आणि प्रदूषणाचा विळखा; राज्यासाठी हवामान विभागाचा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामान सध्या अत्यंत अस्थिर झाले असून नागरिकांसाठी ही परिस्थिती धोक्याची ठरत आहे. थंडी, अवकाळी पाऊस आणि वाढते वायू प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम सध्या महाराष्ट्र अनुभवत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला असून, काही भागांत थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांत वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर आता उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहरींमुळे थंडीचा जोर वाढत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात झपाट्याने घट होत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत गारठा अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यातील काही भागांत तापमान लक्षणीयरीत्या खाली घसरले आहे. उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवत असून, काही ठिकाणी किमान तापमान दहाच्या खाली गेले आहे. यामुळे सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेत प्रचंड गारठा जाणवत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहू शकते आणि काही भागांत हलक्या पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या परिसरात वायू प्रदूषणाने गंभीर रूप धारण केले आहे. गेल्या काही रात्री शहरावर धुरकट चादर पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. धूळ, धूर आणि प्रदूषक कणांमुळे दृश्यता कमी झाली असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास, खोकला, सर्दी, ताप, डोळ्यांची जळजळ आणि गळ्यात दुखणे यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे.

हवामान विभागाने आणि आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि श्वसनाचे आजार असलेल्यांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर जाताना मास्कचा वापर करावा आणि थंड वाऱ्यापासून संरक्षण घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

देशपातळीवरही हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात तापमान आणखी घटण्याची शक्यता असून, तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही राज्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, दक्षिण भारतातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात आणखी दोन ते तीन अंशांची घट होण्याची शक्यता असून, सकाळच्या वेळेत दाट धुके पडू शकते.

एकूणच, थंडी आणि प्रदूषणाच्या दुहेरी संकटामुळे पुढील काही दिवस नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत. त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे आणि स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number