Maharashtra Weather: महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा अचानक रंग बदलला असून राज्यात दुहेरी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने राज्यातील एकूण 11 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारनंतर हवामानात अचानक बदल होऊन काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी उघड्यावर न थांबण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे, सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या बदलत्या हवामानामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो. सायंकाळच्या वेळेत ढगाळ वातावरण अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाडाही जाणवू शकतो.
दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. या भागांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता पुरेसे पाणी पिणे आणि थेट उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यात सध्या एका बाजूला पावसाचा इशारा आणि दुसऱ्या बाजूला उष्णतेचा तडाखा अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली असून पुढील काही दिवस हवामान आणखी बदलण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.