मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात अचानक मोठा बदल झाला असून थंडीचा कडाका कमालीचा वाढला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली घसरला आहे. मात्र, या थंडीसोबतच वाढते प्रदूषण आणि धुक्याचे संकट नागरिकांच्या चिंतेत भर टाकत आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवेची गुणवत्ता ढासळल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
मुंबई आणि उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुके पाहायला मिळत आहे. धुक्यामुळे सकाळी 5 ते 9 या वेळेत रस्त्यांवरील दृश्यमानता अत्यंत कमी झाली असून, महामार्गांवर वाहन चालवताना चालकांना मोठी अडचण ठरत आहे. प्रशासनाने अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तास मुंबईकरांसाठी थंडीचे असतील. सध्या मुंबईचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम पिकांवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या थंडीत आणि प्रदूषणात स्वतःची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांनी मास्कचा वापर करणे आणि श्वसनाचा त्रास असलेल्यांनी पहाटे घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
पुणे शहराची स्थिती अधिक गंभीर असून, गेल्या काही दिवसांत येथील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. हिवाळ्यातील संथ वारे आणि वाढते बांधकाम व वाहनांची वाढती संख्या यामुळे प्रदूषणाचे कण हवेच्या खालच्या थरात राहत आहेत. पुण्यातील अनेक भागांत 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) 180 च्या पार गेल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून डोळ्यांची जळजळ होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरावर पसरलेले धूर आणि धुक्याचे मिश्रण (Smog) आरोग्यासाठी धोकादायक मानले जात आहे.
बदलत्या हवामानात स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी नागरिकांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रदूषणापासून फुफ्फुसांचे संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना एन-95 मास्कचा नियमित वापर करावा. धुक्याच्या वातावरणात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने, वाहन चालवताना 'फॉग लाईट्स'चा वापर करावा आणि वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. तसेच, हिवाळ्यात तहान कमी लागत असली तरी शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.