Maharashtra Weather Update: अवकाळीचं संकट टळलं, पण आता उकाड्याची टांगती तलवार; अकोल्यासह ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD चा अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Weather Update:  अवकाळीचं संकट टळलं, पण आता उकाड्याची टांगती तलवार; अकोल्यासह ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD चा अलर्ट जारी

अकोला: निसर्ग सध्या कमालीच्या लहरीपणाचा अनुभव देत आहे. कधी काळ्याभोर ढगांची गर्दी, तर कधी घामाच्या धारा पुसणारा उकाडा, फेब्रुवारी महिना सरताना महाराष्ट्रातील हवामानाने जणू तिन्ही ऋतूंचा 'फ्यूजन' सोहळाच मांडला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यावर घोंघावणारे अवकाळी पावसाचे सावट आता निवळले असले, तरी त्यामागे उन्हाच्या तीव्र झळांचा दाह सोसावा लागत आहे. थंडी, पाऊस आणि उकाडा अशा तिहेरी कात्रीत अडकलेल्या जनजीवनाला आता सूर्याच्या प्रखरतेचा सामना करावा लागणार आहे.

अवकाळी पावसाने गेल्या चार दिवसांत राज्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले. गारपिटीच्या माऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, निसर्गाची ही वक्रदृष्टी आता वळली असून, पावसाचे सावट दूर होताच सूर्याने आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यावरील अवकाळीचे संकट आता दूर झाले असले तरी तापमानाचा पारा सातत्याने चढ-उतार अनुभवत आहे, ज्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे झाले आहे.

यंदाच्या हिवाळ्याचे गणित सुरुवातीपासूनच कोडे घालणारे राहिले. डिसेंबर महिन्यात उत्तर भारतात कडाक्याची थंडी असताना महाराष्ट्रात मात्र अपेक्षित असलेली 'शीतलहर' तशी बेपत्ताच होती. त्यातच 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मोठ्या पावसाने राहिली-सहली थंडीही पळवून लावली. फेब्रुवारी महिना उजाडताच थंडी गायब झाली आणि उन्हाचा चटका वाढू लागला. यंदाचा फेब्रुवारी महिना उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंची एकाच वेळी प्रचिती देणारा ठरला आहे, जो हवामान बदलाचा एक गंभीर संकेत मानला जात आहे.

हेही वाचा: Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मोठा मेगा ब्लॉक, विद्याविहार ते…

पुणे आणि परिसरातही हवामानाचा विचित्र खेळ सुरू आहे. लोहगावमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पहाटेचा गारवा आणि दुपारचा चटका यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मागील आठवड्यात शहरात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असा लपंडाव सुरू होता, मात्र आता पहाटे जाणवणारी थंडीही ओसरू लागली असून किमान तापमान 11 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात आहे.

तापमानाची आकडेवारी पाहिल्यास हा विरोधाभास अधिक ठळकपणे जाणवतो. देशात पंजाबमधील भटिंडा येथे 10 अंश सेल्सिअस या नीचांकी तापमानाची नोंद झाली, तर महाराष्ट्रात धुळे 12.2 अंश सेल्सिअससह राज्याचे 'कुलू-मनाली' ठरले आहे. याउलट, विदर्भातील अकोल्यात तापमानाने 36.3 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडून राज्याला चटके देण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला नीचांकी पारा आणि दुसऱ्या बाजूला अंगाची लाहीलाही करणारा उकाडा, अशा टोकाच्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होताना दिसत आहे.

एकूणच, निसर्गाचे हे बदललेले रूप येणाऱ्या भीषण उन्हाळ्याची नांदी मानली जात आहे. फेब्रुवारीतच तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस पार जात असेल, तर एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता किती असेल, याची धास्ती आता सर्वांना लागली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आता निसर्गाच्या या लहरीपणासमोर मानवी नियोजन किती टिकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: Gold SIlver Rates: सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ, चांदी आठ हजार रुपयांनी महाग; आजचे ताजे भाव जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number