पुणे : कोरेगाव पार्कमधील तब्बल 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या मालकीच्या ‘अमेडिया कंपनी’शी संबंधित या व्यवहारामागे मोठा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बावधन पोलिस ठाण्यात शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप असा आहे की, या तिघांनी शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक करून राज्याला मोठा महसुली तोटा पोहोचवला आहे.
या व्यवहाराचा केंद्रबिंदू ठरली आहे ती शीतल तेजवानी आणि तिच्याभोवतीच या प्रकरणाचा संपूर्ण खेळ फिरतोय. ही जमीन पूर्वी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात होती. सरकारी मालकीची ही जमीन विक्रीसाठी सोडवणं अशक्यप्राय होतं, पण शीतल तेजवानीने थंड डोक्याने संपूर्ण प्लॅन आखला. तिने मूळ 272 मालकांना शोधून प्रत्येकी फक्त 10 ते 15 हजार रुपये देत “कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी” आपल्या नावावर घेतली. त्यानंतर 2025 मध्ये तिला ‘अमेडिया होल्डिंग्ज’ नावाची कंपनी मिळाली, ज्यामध्ये 99 टक्के भागीदारी पार्थ पवार यांची आणि 1 टक्का दिग्विजय पाटील यांची होती. हे तीने हेरल्यानंतर शीतलने या कंपनीशी मोठी डील ठरवली आणि व्यवहार पूर्ण झाला.
हेही वाचा: Bhaskar Jadhav Son: खेडमध्ये शिवसेना युवा जिल्हाप्रमुखावर हल्ला! आमदार भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल
मात्र, या सगळ्यामागे फक्त जमीनच नव्हे, तर लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि सरकारला झालेला महसुली तोटा लपला होता. दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांनी आवश्यक शुल्क आकारले नाही, अशी तक्रार करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच वेळी या प्रकरणात सर्वात संशयास्पद गोष्ट म्हणजे अमेडिया कंपनीचे संचालक पार्थ पवार असूनही त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एका भागीदारावर गुन्हा नोंदवला गेला आणि दुसरा मात्र तपासाच्या कक्षेबाहेर राहिला, असा सवाल आता राजकीय वर्तुळात तीव्रतेने उपस्थित होत आहे.
या प्रकरणात आणखी थक्क करणारी बाब म्हणजे, शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांचा वादग्रस्त भूतकाळ. सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याचा आरोपी आहे आणि त्याच्यावर ईडीची चौकशीही झाली होती. एवढंच नाही, तर या दाम्पत्यावर तब्बल 100 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं समोर आलं आहे. सागरने रेणुका लॉन्सच्या नावाने 1 कोटी 16 लाख आणि 2 कोटी 24 लाखाचं वाहन कर्ज घेतलं. शीतलने दोन लक्झरी कारसाठी 4 कोटी 80 लाख कर्ज घेतलं. त्याशिवाय सागर लॉन्सच्या नावावर 16 कोटी 48 लाखांचं कॅश क्रेडिट कर्ज आणि त्यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रा कंपनीवर 5 कोटी 95 लाखांचं कर्ज आहे. या सर्वांची बेरीज जवळपास 100 कोटी रुपयांच्या जवळ जाते.
सध्या शीतल तेजवानी कुठे आहे ही माहिती समोर आलेली नाही. मात्र, पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार तिची भूमिका या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिच्या चौकशीतून अमेडिया कंपनी तसेच पार्थ पवार यांच्यातील आणखी धक्कादायक संबंध समोर येऊ शकतात. राजकारण, जमीन आणि पैशांचा संगम असलेलं हे कोरेगाव पार्क प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय बनलं आहे. आता राज्यात एकच प्रश्न चर्चीला जातोय. “शीतल तेजवानी ही फक्त प्यादी होती का, की संपूर्ण खेळाची सूत्रधार?” पोलिस चौकशी सुरू आहे, पण पुढील काही दिवसांत या प्रकरणातून आणखी अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा: Gold-Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा झळाळी; चांदीही झाली महाग, आजचे दर जाणून घ्या