वाशिम: शहरातील पाटणी चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या सुमारे 40 क्विंटल सोयाबीनच्या गोण्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, या आगीचे कारण तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच वाशिम नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला आणि जवानांनी तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले आणि गोडाऊनमधील संपूर्ण माल जळून खाक झाला.
घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गोडाऊनमधील सर्व माल नष्ट झाल्यामुळे मोठ्या आर्थिक तोट्याची नोंद झाली आहे.
हेही वाचा: Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस किती काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील? पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील काढणी झाल्यानंतर साठवून ठेवलेला सोयाबीनचा माल ठेवलेला होता. त्यामुळे नुकतेच अतिवृष्टीमुळे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत पुन्हा एकदा संकट कोसळले आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. अग्निशमन दलाकडून घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.