मुंबई: घर खरेदीदारांच्या हितसंबंधांची काळजी घेत, स्थावर संपदा क्षेत्रातील पारदर्शकता आणि गृहनिर्माण प्रकल्पांच्या नियमनाची आपली वचनबद्धता कायम ठेवत महारेराने 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 10, 379 गृहनिर्माण प्रकल्पांना विविध परवानग्या दिल्या आहेत. यातील 4204 गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक मंजूर करण्यात आले आहेत . 2488 गृहनिर्माण प्रकल्पांतील सुधारणांना ( Corrections) मंजुरी देण्यात आली. जुन्या प्रकल्पांबाबत विकासकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार 3687 गृहनिर्माण प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.
कारण गृहनिर्माण प्रकल्पाला महारेराकडून मंजुरी घेताना सादर केलेल्या प्रस्तावात काही दुरुस्त्या, बदल किंवा वाढ करण्यात आली असल्यास या सर्व ‘सुधारणा‘( Corrections) या अंतर्गत येणाऱ्या बाबी महारेराकडून वेळोवेळी नियमित करून घेणे अनिवार्य आहे. अत्यावश्यक आहे. शिवाय महारेराकडे नोंदणी करताना विकासकांना प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रकल्प पूर्ततेची निश्चित तारीख द्यावी लागते. प्रकल्पाला काही कारणाने उशीर झाल्यास अश्यावेळी संबंधित विकासकांना महारेराकडून मुदतवाढ ( Extensions) घ्यावी लागते. मुदतवाढ न घेतल्यास प्रकल्प व्यापगत ( Lapsed) प्रकल्पांच्या यादीत जाऊन त्याचे काम प्रभावित होते. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महारेराकडून मुदतवाढ घेणे म्हणून अत्यावश्यक आहे. एकूण ग्राहकहिताच्या दृष्टीने मुदतवाढ आणि सुधारणांना मंजुरी देणे अत्यावश्यक आहे. ही कारवाई स्थावर संपदा क्षेत्रातील प्रस्तावांचे जलद निराकारण, पारदर्शकता आणि घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करीत कार्यक्षम प्रकल्प नियमन करण्यासाठी महारेराची वचनबद्धताच दर्शवते.
प्रकल्पांच्या संख्येत पुणे जिल्हा 3150 प्रकल्पांसह नेहमीप्रमाणे आघाडीवर असून विभागातील संख्येच्या बाबतीत मुंबई महाप्रदेश ( MMR) 5494 प्रकल्पांसह स्थावर संपदा क्षेत्रातील राज्यातील आपला दबदबा कायम ठेऊन आहे. मुंबई महाप्रदेशात ठाणे 1714 आणि 1696 प्रकल्पांसह मुंबई उपनगर आघाडीवर आहे. पुणे परिसरातील 3566 प्रकल्पांत पुण्यानंतर प्रत्येकी 145 प्रकल्पांसह कोल्हापूर, सातारा विकसित होत आहेत. विदर्भात एकूण 563 प्रकल्प असले तरी यात नागपूरच्या 474 प्रकल्पांचा वाटा महत्वाचा आहे. खानदेशातही एकूण 520 प्रकल्पांत नाशिकचे 454 प्रकल्प आहेत तर मराठवाड्याची 203 प्रकल्पांत संभाजीनगरचे 155 प्रकल्प आहेत.
एरव्हीही महारेरा निर्धारित केलेल्या कायदेविषयक ( Lagal ), तांत्रिक ( Technical) आणि आर्थिक (Financial ) निकषांची काटेकोर छाननी करून त्याची पूर्ण पूर्तता करणाऱ्या प्रकल्पांना मंजुऱ्या देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी महारेराच्या नोंदणी विभागाची समग्र यंत्रणा यथोचित प्रयत्नशील आहे.
जिल्हानिहाय मंजुरीचा तपशील-
मुंबई महाप्रदेश (MMR) एकूण 5494
ठाणे 1714 , मुंबई उपनगर 1696, रायगड 939, पालघर 568, मुंबई शहर 375, रत्नगिरी 134 आणि सिंधुदुर्ग 68
पुणे परिसर एकूण 3566
पुणे 3150, सातारा 145, कोल्हापूर 145, सांगली 66, सोलापूर 60
विदर्भ- एकूण 563
नागपूर 474, अमरावती 28, अकोला 18, वर्धा 18, चंद्रपूर 13, यवतमाळ 5, बुलढाणा 4, भंडारा 2, वाशीम 1
खानदेश- एकूण 520
नाशिक 454, अहिल्यानगर 43, धुळे 14, जळगाव 8 आणि नंदुरबार 1
मराठवाडा- एकूण 203
संभाजीनगर 155, लातूर 18, नांदेड 11 , जालना 7, धाराशिव आणि परभणी प्रत्येकी 4 आणि हिंगोली 1
दादरा नगर हवेली – 29
दमण – 4