Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीची नवी रणनीती; 3 स्वीकृत जागांचाही थेट निवडणूक फॉर्म्युल्यात समावेश

यंदाच्या निवडणुकीत महायुतीने 25 ऐवजी तब्बल 28 जागांचे तगडे गणित मांडण्यास सुरुवात केली आहे.

Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीची नवी रणनीती; 3 स्वीकृत जागांचाही थेट निवडणूक फॉर्म्युल्यात समावेश

Gokul Election 2026 :  कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय सत्ताकेंद्र समजल्या जाणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीने 25 ऐवजी तब्बल 28 जागांचे तगडे गणित मांडण्यास सुरुवात केली आहे. इतिहासात पहिल्यांदाच गोकुळच्या संचालक मंडळाची व्याप्ती वाढली असून, प्रत्यक्ष निवडून येणाऱ्या 25 जागांसोबतच 2 तज्ज्ञ संचालक आणि 1 शासकीय प्रतिनिधी अशा एकूण 3 स्वीकृत जागांचा समावेश थेट जागावाटपाच्या फॉर्म्युल्यातच केला जात आहे. महायुतीमधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि जनसुराज्य शक्ती पक्ष या 4 प्रमुख घटकांमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

नाराज नेत्यांची स्वीकृत पदांवर बोळवण 

गोकुळमध्ये पूर्वी 21 निर्वाचित आणि 3 स्वीकृत असे 24 संचालकांचे मंडळ होते. मात्र, नव्या नियमांनुसार निवडून येणाऱ्या जागा 25 झाल्याने महायुतीसमोर सर्वच पक्षांतील प्रमुख इच्छुकांची सोय करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतील नेत्यांची नाराजी टाळण्यासाठी 2 तज्ज्ञ आणि 1 शासननियुक्त संचालकाचे नाव निवडणूकपूर्व वाटाघाटीतच निश्चित केले जाण्याची दाट शक्यता आहे. जागावाटपात एखाद्या बड्या नेत्याची किंवा त्याच्या समर्थकाची संधी हुकल्यास, त्याला स्वीकृत संचालक पदाचे आश्वासन देऊन शांत ठेवण्याची रणनीती आखली जात आहे. यामुळेच महायुतीचा निर्णय काहीही झाला तरी अर्ज दाखल करून ठेवलेला बरा, या भूमिकेतून बहुतांश इच्छुकांनी आपापली तयारी सुरू ठेवली आहे.

हेही वाचा – Nila Vikhe Patil: स्वीडनच्या संसदेत घुमणार महाराष्ट्राचा आवाज! विखे-पाटलांची कन्या 'रिक्सदाग'मध्ये खासदार

अनधिकृत पर्यायांचीही चाचपणी

या निवडणुकीत ठरावधारकांच्या संख्याबळावरून जागांचा दावा केला जात असला, तरी अंतिम महायुती झाल्यास अनेक दिग्गजांना माघार घ्यावी लागणार आहे. ज्या पक्षाला महिला, अनुसूचित जाती किंवा इतर मागास प्रवर्गातील राखीव जागा दिल्या जातील, त्यांच्या सर्वसाधारण गटातील उमेदवारांची संख्या कमी केली जाऊ शकते. तसेच एकाच कुटुंबातील 2 उमेदवारांना टाळणे आणि विधानसभानिहाय राजकीय समतोल साधणे यावर नेत्यांचा भर असणार आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये सन्मानजनक स्थान न मिळाल्यास पक्षांतर किंवा विरोधी आघाडीचा पर्याय निवडण्याची तयारीही काही असंतुष्ट इच्छुकांनी आतून सुरू केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number