Mahesh Shinde On Satara Eknath Shinde Sabha : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र साताऱ्यात पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई हे मला पहिल्यापासूनच वेगळी वागणूक देत असल्याच म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. आज साताऱ्यामध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडत आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून यावेळी एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वरून आमदार महेश शिंदे यांचा फोटो मात्र गायब करण्यात आला आहे.
यावर आता आमदार महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर कधीच माझा फोटो घेण्यात आला नाही, या अगोदर सुद्धा पहिल्यापासून फोटो नसल्याने याबाबत मला काही दुःख वाटत नाही.पालकमंत्री शंभूराज देसाई हे एकटे जिल्ह्याचे निर्णय घेत असतात त्यांना जे योग्य वाटतं तो निर्णय ते घेत असतात. साताऱ्यात होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचा निमंत्रण मला नाही त्यामुळे मी या कार्यक्रमाला येणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी दिले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात. कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलावलं जात नाही, असे सांगत 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगितले त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो असल्याचे महेश शिंदे यांनी स्पष्ट केल आहे.
यावर आता शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमिवर पुण्यातून शिवसेना शिंदे गटातील नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “आमचे सिनियर मंत्री शंभूराज देसाई आहेत, कोणाला डावलून काम होत नाही… शिवसेनेचे साम्राज्य साताऱ्यात मोठ आहे… एकनाथ शिंदे यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेय… आज गांधी मैदानात रेकॉर्ड ब्रेक सभा होणार काही लोकांना कळेल शिवसेना आहे की नाही… माझ्याकडे देखील साहेब येणार आहेत जिथं जिथं निवडणूकामध्ये चांगले यश मिळाले तिथं एकनाथ शिंदे सभा घेणार… मी कोणाचं नाव घेणार नाही शिंदे साहेबांना आवाहन देणारे कसे मातीमोल झाले हे तुम्हांला माहिती आहे… ज्यांना साहेबांनी मोठं केलेय त्यांनी तर देऊचं नये…”