Kalyan: अरे बापरे! एसी लोकलच्या टपावर चढला तरुण, कल्याणमध्ये 50 मिनिटांचा ड्रामा; पोलिसांची दमछाक

विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान एसी लोकलच्या टपावर तरुण चढल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

Kalyan: अरे बापरे! एसी लोकलच्या टपावर चढला तरुण, कल्याणमध्ये 50 मिनिटांचा ड्रामा; पोलिसांची दमछाक

मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान आज दुपारी घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. बदलापूरहून दादरच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये एका तरुणाने अचानक गाडीच्या छतावर चढून थेट प्रवास सुरू केल्याने संपूर्ण रेल्वे यंत्रणा काही काळ विस्कळीत झाली.दुपारी साधारण 2 वाजून 3 मिनिटांच्या सुमारास ही लोकल विठ्ठलवाडी–कल्याण मार्गावर धावत असताना हा तरुण गाडीतून बाहेर पडून थेट टपावर पोहोचला. प्रचंड उन्हाचा तडाखा आणि वरून असलेल्या उच्चदाब विजेच्या तारांचा धोका असूनही तो काही काळ तिथेच थांबून राहिला. यामुळे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली.

विठ्ठलवाडी स्थानकावर रेल्वे पोलिसांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पुन्हा एकदा चकवा देत टपावर चढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अखेर ही लोकल कल्याण स्थानकाकडे वळवण्यात आली. दरम्यान, गाड्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या होत्या.कल्याण स्थानकावर दुपारी सुमारे 2:50 वाजता ही गाडी पोहोचल्यानंतर रेल्वे पोलीस, कर्मचारी आणि काही स्थानिक मदतीने मोठ्या शिताफीने या तरुणाला खाली उतरवण्यात यश आले. तब्बल 50 मिनिटे सुरू असलेल्या या थरारक घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

या घटनेमुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती. प्रवाशांना भर उन्हात गाड्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर प्रतीक्षा करावी लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण मानसिक आजाराने त्रस्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला ताब्यात घेऊन कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आले असून, त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे. या घटनेने रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number