मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव आंदोलनस्थळी दाखल होत असल्याने अंतरवाली सराटीमध्ये गर्दीचा ओघ वाढताना दिसत आहे. दरम्यान, मागील चार दिवसांपासून जरांगे पाटील यांनी पुन्हा पाणी, सलाईन आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.
त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.तर दुसरीकडे, उपोषणस्थळी मराठा समाजबांधवांची मोठी वर्दळ सुरू झाली आहे. दरम्यान जरांगेंनी माध्यमांशी बोतलाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुंबईला येण्याचा प्लॅन देखील सांगितला आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मराठ्यांची ही शेवटची लढाई आहे, त्यानुसार प्रत्येकाने तयारी करा. 12 सप्टेंबरला बांदा ते चांदा अशा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांनी कोणतेही कारण न देता आंतरवाली सराटीत बैठकीसाठी उपस्थित राहा. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तुम्हाला उपोषणाची गरज पडणार नाही, असे सरकारमधील मंत्री महोदय सांगत होते. परंतु सरकारने आता वेळकाढूपणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता आपल्याला पुढची भूमिका ठरवावी लागणार आहे.”
“येत्या 12 तारखेला पुणे, नगर, नाशिक, तसेच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील मराठा समाजाने हातातली कामे टाकून अंतरवालीला बैठकीसाठी या. मराठा आरक्षणासंदर्भात आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. सरकार मराठ्यांची फसवणूक करत असून, 12 तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवून सरकारचा माज उतरवण्यासाठी सर्वांनी मुंबईकडे निघायचे आहे. मात्र येताना एकाही आंदोलकावर हल्ला झाला, थेंबभरही रक्त निघाले तर दहा मिनिटात अख्खा महाराष्ट्र बंद पाडा,”
पुढे राज्य सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून प्रचंड निष्काळजीपणा सुरू आहे. हे केवळ शिंदे आणि फडणवीस यांची मिळीभगत असून ते मराठ्यांना फसवण्याचे काम करत आहेत. पोलिसांचा यात काहीही दोष नाही, सर्व दोष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. सरकारच्या या धोरणामुळे मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.”