ग्रामसभेच्या ठरावासंदर्भातील कागदपत्रे पंचायत समिती कार्यालयात जमा करण्यासाठी गेलेल्या ग्रामरोजगार सेवकासोबत वाद झाल्यानंतर त्याला चपलीने मारहाण केल्याची घटना मानोरा येथे घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीसोबतच जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गादेगाव येथील ग्रामरोजगार सेवक ग्रामसभेच्या ठरावांचे अहवाल सादर करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आला होता. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असतानाच गादेगाव येथील सुदाम भिका जाधव आणि पुष्पा महादेव चव्हाण तेथे आले. त्यानंतर संबंधित ग्रामरोजगार सेवकाशी त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तक्रारीनुसार, दोघांनी ग्रामरोजगार सेवकाच्या डोक्यावर आणि पाठीवर चपलीने मारहाण केली. तसेच जातीचा उल्लेख करत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे. कार्यालयात उपस्थित असलेल्या काही कर्मचारी आणि नागरिकांनी हा प्रकार पाहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर ग्रामरोजगार सेवकाने मानोरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून सुदाम जाधव आणि पुष्पा चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.