Marathwada Bandh: जरांगेंच्या उपोषणानंतर मराठवाडा पेटला; परभणी-लातूरमध्ये शाळांना सुट्टी, 5 जिल्ह्यांत कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात आंदोलन तीव्र झाले आहे. परभणी-लातूरमध्ये शाळांना सुट्टी, तर बीड, धाराशिव आणि नांदेडमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Marathwada Bandh: जरांगेंच्या उपोषणानंतर मराठवाडा पेटला; परभणी-लातूरमध्ये शाळांना सुट्टी, 5 जिल्ह्यांत कडकडीत बंद

महाराष्ट्र: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज सहावा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीबाबत वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

परभणी आणि लातूरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद

परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून, सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर शहरासह औसा, अहमदपूर आणि मुरुड परिसरातही कडकडीत बंद पाळला जात असून, बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Maratha Reservation: अंतरवाली सराटीत दुर्दैवी घटना! मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

बीडमध्ये सर्वपक्षीय बंद

बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत अनेक व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवली आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन आणि निदर्शने सुरू आहेत.

धाराशिवमध्ये व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडा, वाशी आणि कळंब या तालुक्यांमध्येही व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवली आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे आणि घोषणाबाजी होत असल्याने पोलिसांनी संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

नांदेडमध्ये बंदवरून संभ्रम

नांदेड जिल्ह्यात आंदोलनाला वेगळे स्वरूप आले आहे. एका गटाने आज बंद आणि रास्ता रोकोची घोषणा केली असून, दुसऱ्या गटाने 4 सप्टेंबरला जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, कंधार येथे काही आंदोलक तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून घोषणाबाजी करत आंदोलन करताना दिसले. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: Manoj Jarange: 'तुमच्या शब्दाचा मान राखतो..' जरांगे पाणी प्यायले; सलाईन घेतो म्हणाले.. पण उपोषणावर ठाम

कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक बंदोबस्त

मराठवाड्यातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रमुख चौक, महामार्ग आणि सरकारी कार्यालयांजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मराठवाड्यातील परिस्थितीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number