Wednesday, January 14, 2026 01:38:18 PM

Santosh Deshmukh Case : क्रूरतेचा कळस, अमानुषतेची परिसीमा गाठणाऱ्या निर्घृणतेची वर्षपूर्ती; संतोष देशमुखला न्याय कधी?, कुटुंबिय प्रतिक्षेत

गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा आणि राज्य हादरले होते.

santosh deshmukh case  क्रूरतेचा कळस अमानुषतेची परिसीमा गाठणाऱ्या निर्घृणतेची वर्षपूर्ती संतोष देशमुखला न्याय कधी कुटुंबिय प्रतिक्षेत

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोगला मागील आठवड्यात भेट देत देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. या भेटीदरम्यान संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर आपली वेदना व्यक्त करत, “दादा, वर्ष उलटले तरी आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही,” अशी खंत मांडली.

मारेकऱ्यांच्या क्रौर्याने हादरले होते गाव

गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा आणि राज्य हादरले होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खंडणीसाठी रचलेल्या कटातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड यांच्यासह सात आरोपींना अटक झाली असली, तरी एक आरोपी कृष्णा आंधळे आजही फरार आहे.

एक वर्षानंतरही आरोप निश्चित नाहीत; कुटुंबीयांची अस्वस्थता कायम

प्रकरणाला संपूर्ण एक वर्ष झाल्यानंतरही न्यायालयात आरोप निश्चित न झाल्याने देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. तपासात संथगती असल्याचे सांगत गावकऱ्यांनीही उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली. “एसपी अधिकारी बदलून काही फरक पडला नाही. आरोपी अजूनही निर्धास्त आहेत. आमच्या गावाने पहिले कधीच असा एकजुटीने आवाज उठवला नव्हता, आम्हाला न्याय हवाय,” असे गावकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: Priyanka Gandhi Vs PM Narendra Modi : प्रियांका गांधींनी मोदींचे नेहरुंवरील आक्षेप फेटाळले म्हणाल्या, "जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान तेवढे दिवस नेहरु..."

धनंजय देशमुखांना आठवणींचा वेदनादायी भार

सकाळी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख भावनांनी भारावून गेले. “कर्तामाणूस घरातून गेला… आमचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. एक वर्ष उलटले तरी आमच्या वेदनेला न्यायाचे स्वरूप लाभलेले नाही,” असे ते म्हणाले. भावनांनी ओथंबलेले धनंजय यांचे अश्रू पुसताना वैभवीने काकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

न्यायालयाचा तपास यंत्रणांना आदेश

तपासातील विलंबाबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, गेल्या तीन महिन्यांतील तपासाची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी तुरुंगात असले तरी खटल्याची गती वाढणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत आहे. या प्रकरणात न्याय मिळायला उशीर होत आहे, 12 डिसेंबर रोजी आरोप निश्चित केले जातील. न्यायालयाने फरार कृष्णा आंधळे याच्या चौकशीवर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने गेल्या तीन महिन्यांतील तपास यंत्रणांकडून तपासाची माहिती मागवून घेतली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर गंभीर आरोप

या हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्यावरही संशय उपस्थित होत असल्याचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केले. अशा लोकांना अजित पवार आणि त्यांचा पक्ष पाठीशी घालतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्यावर कारवाई करत नाहीत, मग तुमचाही यात हात आहे का? अशी शंका उपस्थितीत होते. “अशा मारेकरी लोकांना पाठीशी घालणाऱ्यांनीही स्वतःकडे पाहावे. संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

कुटुंबाची एकच मागणी ‘न्याय मिळावा’ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुटुंबीयांना धीर देत प्रकरणात आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले असले तरी कुटुंबाचे व गावकऱ्यांचे एकच म्हणणे आहे “संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही.”

संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष उलटूनही न्यायाची दारे अद्याप उघडलेली नाहीत. कुटुंबीय, गावकरी आणि सामाजिक पातळीवर उभा राहिलेला न्यायासाठीचा आक्रोश एकच मागणी करत आहे, या क्रूर हत्येचा शेवट न्यायानेच व्हावा. तपासाची दिशा जशी पुढे जाईल तसे खरे आरोपी समोर येतील आणि त्यांना कठोर शिक्षा न्यायालय देईल का? हे या प्रकरणात पाहणे महत्वाचे ठरेल. 

हेही वाचा: Baba Adhav Death: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधक विचारांचे प्रखर प्रसारक काळाच्या पडद्याआड


सम्बन्धित सामग्री