पावसाळ्यात निसर्गरम्य सौंदर्याने नटणाऱ्या माथेरानची खास ओळख असलेली मिनी ट्रेन आता पुन्हा पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. मुंबई–पुणेकरांच्या विकेंड ट्रिपसाठी हक्काचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या या हिल स्टेशनकडे घेऊन जाणारी नेरळ–माथेरान मिनी ट्रेन 1 नोव्हेंबरपासून पुन्हा धावणार असून, यामुळे पर्यटनाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
माथेरान हे मुंबई आणि पुण्याजवळ असल्यामुळे येथे सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात ही सेवा बंद करण्यात आली होती. यावर्षी पाऊस उशिरा ओसरल्याने मिनी ट्रेन सुरू होण्यासाठी तब्बल एक महिना उशीर झाला.
अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गावरील अनेक भाग बाधित झाले होते. कड्यावरचा गणपती परिसरात भूस्खलन झाल्यामुळे ट्रॅकखाली सुरक्षा भिंतीचे काम सुरू करण्यात आले. पावसाच्या अडचणीमुळे कामाचा वेग कमी झाला असला तरी, रेल्वे प्रशासनाने काहीच दिवसांत सर्व दुरुस्ती पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा: Phaltan Doctor Death Case: चार महिने त्यांच्यात..., आरोपी बदनेसोबतचा वाद काय?; वकिलांचा न्यायालयात खळबळजनक दावा
माथेरान मिनी ट्रेनचा इतिहास काय आहे?
1907 साली ब्रिटिश काळात सर आदमजी पिरभाय यांनी या रेल्वेचे उद्घाटन केले. दरवर्षी पावसाळ्यात 14 जून रोजी सेवा थांबते आणि दसऱ्यानंतर पुन्हा सुरू होते. मात्र यंदा हवामानामुळे उशीर झाला.
नेरळ ते माथेरान 21 किलोमीटरचा हा सुंदर प्रवास साधारण 2.5 ते 3 तासांचा असून, पश्चिम घाटातील दऱ्या–कडे आणि हिरवाईने नटलेल्या दृश्यांचा नेत्रसुखद अनुभव मिळतो. छोट्या अंतरासाठी अमन लॉज ते माथेरान 20 मिनिटांची विशेष सेवा उपलब्ध आहे. बहुतेक वेळा तिकिटांसाठी प्रत्यक्ष स्थानकावरच व्यवस्था असते.
पर्यटकांसाठी हिवाळा आणि सणासुदीचा हंगाम अत्यंत लोकप्रिय असतो. त्यामुळे सेवेला पुनर्बहाली मिळाल्यानंतर माथेरानमध्ये गर्दी वाढून पर्यटन व्यवसाय पुन्हा तेजीत येईल, अशी उत्सुकता स्थानिकांमध्ये आहे.
हेही वाचा: Pune Jain Boarding: बिल्डर विशाल गोखलेंचा मोठा निर्णय, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात येणार