Wednesday, July 09, 2025 09:50:46 PM

एमडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी वागणूक

वाळूजमध्ये सव्वा कोटींचं एमडी ड्रग्स प्रकरण उघडकीस, मुख्य आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक; कल्याणमध्ये 20 किलो गांजासह दोन तस्कर अटकेत.

एमडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी वागणूक

छत्रपती संभाजीनगर:  वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथून अलीकडेच तब्बल सव्वा कोटींच्या एमडी ड्रग्सचा साठा सापडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन वाहने जप्त केली असून, दोन गोदामेही सील केली आहेत. मात्र, या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली व्हीआयपी वागणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

बबनभाईला पोलिसांनी थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हॉलमध्ये टेबलावर बसवून, थंड फॅनच्या हवेत, त्याच्या कुटुंबासोबत जेवणाची खास व्यवस्था केली होती, असे सांगितले जात आहे. या प्रसंगाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय. इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स प्रकरण असूनही आरोपीवर कोणताही दबाव न आणता उलट आरामदायी वागणूक दिली जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या निष्पक्षतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

दरम्यान, कल्याण रेल्वे गुन्हे शाखेनेही गांजाच्या तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. ओडिसा येथून गांजा आणणाऱ्या मेहताब आलम इर्शाद आलम शेख आणि लाल अहमद अमीन कोटकी या दोन तस्करांना कल्याण रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 20 किलो 869 ग्रॅम गांजा, अंदाजे 4 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री