मुंबई: मुंबईसारख्या मायानगरीत आपलं हक्काचं घर असावं, हे प्रत्येक सर्वसामान्याचं स्वप्न असतं. अनेकदा बजेटमुळे किंवा नशिबाची साथ न मिळाल्याने हे स्वप्न अधुरं राहतं. मात्र, आता घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. म्हाडाने (MHADA) मुंबईतील विविध ठिकाणच्या घरांसाठी लॉटरी जाहीर केली असून, यावेळी 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' (First Come First Served) हे तत्त्व राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ नशिबावर अवलंबून न राहता, तुमच्या तत्परतेलाही महत्त्व प्राप्त होणार आहे.
या लॉटरी अंतर्गत म्हाडाने एकूण 120 घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या लॉटरीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या; परंतु काही कारणास्तव रिक्त राहिलेल्या घरांचा यात समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार करता घराची किमान किंमत 31 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर उच्च उत्पन्न गटासाठी ताडदेव (Tardeo) सारख्या पॉश भागात आठ कोटी रुपयांपर्यंतची घरे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आपल्या बजेटनुसार घर निवडण्याची संधी अर्जदारांना मिळणार आहे.
अर्ज प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे
घर खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्यांना 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करता येईल. केवळ नोंदणी करून चालणार नाही, तर 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे आणि 'घर निश्चिती' (House Selection) करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर असल्याने, जो लवकर बुकिंग करेल, त्याला पसंतीचे घर मिळण्याची शक्यता अधिक असेल.
हेही वाचा: Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
'बुक माय होम' आणि पारदर्शक व्यवहार
म्हाडाने या प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता ठेवली आहे. एकदा अर्जदाराने अनामत रक्कम भरली की, त्यांना स्क्रीनवर 'बुक माय होम' (Book My Home) हे बटण दिसेल. यावर क्लिक करताच उपलब्ध इमारती, विंग, मजला आणि घर क्रमांक याची इत्यंभूत माहिती समोर येईल. आपल्याला हवे ते उपलब्ध घर निवडल्यानंतर, पुढील 48 तासांच्या आत घराच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. जर या वेळेत 10 टक्के रक्कम भरली नाही, तर घरावरील दावा रद्द होईल, त्यामुळे आर्थिक नियोजन आधीच करून ठेवणे शहाणपणाचे ठरेल.
रक्कम भरणा आणि मुदत
10 टक्के रक्कम भरल्यानंतर म्हाडाकडून खातरजमा केली जाईल आणि अर्जदारास 'तात्पुरते देकार पत्र' (Provisional Offer Letter) देण्यात येईल. यानंतर, घराची उर्वरित रक्कम भरण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला जाईल. जर काही कारणास्तव 90 दिवसांत रक्कम भरणे शक्य झाले नाही, तर व्याजासह रक्कम भरण्यासाठी आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मिळू शकते. मात्र, ही अंतिम मुदत संपताच कोणतेही कारण न ऐकता घर वितरण रद्द केले जाईल, असा स्पष्ट इशारा म्हाडाने दिला आहे. सर्व व्यवहार एनईएफटी, आरटीजीएस किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
सावधान! फसवणूक टाळा
म्हाडाने स्पष्ट केले आहे की, या लॉटरी प्रक्रियेसाठी कोणतेही प्रॉपर्टी एजंट किंवा दलाल नेमलेले नाहीत. त्यामुळे, जर कोणी व्यक्ती म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैशांची मागणी करत असेल, तर त्याला बळी पडू नका. अशा कोणत्याही अनधिकृत व्यवहाराला म्हाडा जबाबदार राहणार नाही. अशी फसवणूक निदर्शनास आल्यास त्वरित म्हाडाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: Mayor Election Race: पुण्याचा नवा 'कारभारी' कोण? महापौरपदासाठी भाजपच्या गोटात हालचाली, 'या' नावांची जोरदार चर्चा