Mhada Lottery 2026: म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला निघणार 2500 घरांची लॉटरी, पण खिशाला किमती परवडणार का?

म्हाडाची ही नवी सोडत प्रामुख्याने मध्यम आणि उच्च उत्पन्न गटावरच लक्ष केंद्रित करणारी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Mhada Lottery 2026: म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला निघणार 2500 घरांची लॉटरी, पण खिशाला किमती परवडणार का?

'मुंबईत स्वतःच्या हक्काचं एक घर असावं', हे स्वप्न उराशी बाळगून लाखो मुंबईकर दररोज लोकलच्या गर्दीतून प्रवास करत असतात. या सर्वसामान्यांसाठी 'म्हाडा' (MHADA) म्हणजे आशेचा एक मोठा किरण असतो. गेली अनेक महिने मुंबईकर ज्या म्हाडाच्या मुंबई मंडळ सोडतीची डोळे लावून वाट पाहत होते, त्या बहुप्रतिक्षित सोडतीची जाहिरात अखेर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. तब्बल 2500 घरांसाठी ही लॉटरी निघणार असली तरी, गगनाला भिडलेल्या किमतींमुळे ही सोडत सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच जड जाणार असून, त्यांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशाच पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांचा म्हाडाच्या लॉटरीचा आलेख पाहिला, तर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांची संख्या सातत्याने घटत चालल्याचे विदारक चित्र आहे. 2023 मध्ये म्हाडाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढली होती. मात्र, त्यानंतर 2024 मध्ये मुंबई मंडळाने काढलेल्या सोडतीत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती प्रचंड होत्या. परिणामी, अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यातच 2025 या संपूर्ण वर्षात म्हाडाने कोणतीही नवी सोडत काढली नाही. मागील सोडतींमधील शिल्लक घरांची विक्री 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर करण्यात आली खरी, परंतु या घरांच्या कोट्यवधींच्या किमती पाहून सर्वसामान्यांना केवळ बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली.

यंदाच्या वर्षी म्हाडाकडून तब्बल 5000 घरांची जम्बो सोडत काढली जाईल, अशी घोषणा गेल्या वर्षीच करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, गोरेगाव येथील पत्राचाळीतील सुमारे 2500 घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने, ऐनवेळी ही घरे या सोडतीतून वगळण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्यात केवळ 2500 घरांसाठीच नशीब आजमावण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. घरांची संख्या निम्म्याने घटल्याने साहजिकच घरांसाठीची चुरस अधिकच वाढणार आहे.

हेही वाचा: Raj Thackeray: शिवतीर्थावर आज 'राज'गर्जना! ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिलाच गुढीपाडवा मेळावा; भाषणातून कोण होणार लक्ष्य?

या आगामी सोडतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि त्याचवेळी चिंतेची बाब म्हणजे घरांच्या वाढलेल्या किमती. या सोडतीत अत्यल्प गटासाठी मुबलक घरे असली, तरी अल्प गटासाठी असलेल्या घरांच्या किमतीही आता कोट्यवधींच्या घरात पोहोचल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई म्हाडा लॉटरी 2026 अंतर्गत गोरेगावच्या पत्राचाळ प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी अवघी 85 घरे उपलब्ध आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे या घरांची किंमत सुमारे एक कोटी रुपयांच्या घरात असणार आहे. याशिवाय मुलुंड आणि चेंबूरसारख्या उपनगरांमध्येही अल्प गटासाठी अत्यंत मर्यादित घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

म्हाडाची ही नवी सोडत प्रामुख्याने मध्यम आणि उच्च उत्पन्न गटावरच लक्ष केंद्रित करणारी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मध्यम गटासाठी विक्रोळीतील कन्नमवारनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 1221 घरे उपलब्ध असणार आहेत. तसेच, अंधेरी आणि शीव भागातही काही घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. उच्च उत्पन्न गटाचा विचार केल्यास, बोरिवली आणि पवई यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी अत्यंत महागडी घरे उपलब्ध असतील. या घरांची किंमत तब्बल दीड कोटी ते अडीच कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. एकंदरीतच, 'सर्वसामान्यांसाठी घरे' या म्हाडाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात असून, म्हाडाची घरे आता केवळ उच्चभ्रूंच्याच आवाक्यात राहतात की काय, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा: Donald Trump Statement: 'कतारवर हल्ला केला तर याद राखा'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number