छत्रपती संभाजीनगर: समाजातील अन्याय, अत्याचारांना बळी पडलेल्या आणि संरक्षणासाठी बालगृहात ठेवण्यात आलेल्या मुलींनाच तिथे असुविधा, मारहाण आणि अन्यायाचा सामना करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी शहरात समोर आला. शहरातील विद्यादीप बालगृहात राहणाऱ्या नऊ अल्पवयीन मुलींनी बालगृहातील अमानवी वागणुकीविरोधात आवाज उठवत थेट शहरभर धाव घेतली.
सकाळी अचानकपणे हे नऊ मुली बालगृहातून बाहेर पडल्या आणि रस्त्यावर न्याय मागत धावू लागल्या. 'न्याय द्या... न्याय द्या...' अशा आरोळ्या देत त्या शहरभर फिरत होत्या. त्यांच्यापैकी काहींच्या हातावर जखमा दिसून येत होत्या. अंगावर कपडेदेखील नीट नसल्याची काही लोकांनी नोंद घेतली. हातात दगड, पाने घेऊन त्या भेदरलेल्या नजरेने लोकांपासून स्वतःचा बचाव करत होत्या. नागरिक त्यांच्या मागे लागले, काहींनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण मुली भीतीपोटी कोणालाही जवळ येऊ देत नव्हत्या.
या साऱ्या गोंधळात, त्या मुलींनी जवळपास तीन किलोमीटर अंतर पळत पार करत थेट जिल्हा न्यायालय गाठले. न्यायालयातही त्यांनी गोंधळ घातला. अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे न्यायालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वकिल, कर्मचारी आणि पोलीस देखील त्यांचा आक्रोश पाहून स्तब्ध झाले.
प्राथमिक माहिती नुसार, या मुलींना बालगृहात आवश्यक वस्तू जसे की साबण, टूथपेस्ट दिल्या जात नव्हत्या. शिवाय, किरकोळ कारणांवरून त्यांना मारहाण केली जात असल्याचा गंभीर आरोपही या मुलींनी केला आहे. बालगृहात राहूनही जर मुलींना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर ते व्यवस्थेचे मोठे अपयश असल्याचे चित्र या घटनेमुळे समोर आले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच बालकल्याण समिती सक्रिय झाली. रात्री उशिरा या नऊ जणींपैकी सात मुलींना समितीसमोर हजर करण्यात आले. त्यांच्याकडून जबाब नोंदवण्यात आला. या सातपैकी चार मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले, तर उर्वरित तीन मुलींना इतर बालगृहात पाठवण्यात आले. परंतु या नऊ मुलींपैकी दोन मुली अद्यापही बेपत्ता आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही घटना केवळ विद्यादीप बालगृहापुरती मर्यादित नाही, तर एकूणच बालगृह व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस पावले उचलावी, अशी अपेक्षा आहे.