Wednesday, July 09, 2025 10:16:10 PM

मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू; राज्यात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यात रुग्णसंख्या वाढीस सुरुवात. आरोग्य यंत्रणा सतर्क, नागरिकांना मास्क व लसीकरणाचे आवाहन करण्यात आले आहे.

मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू राज्यात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

 सांगली: मिरज पूर्व भागातील एका गावातील 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाच्या घरातील व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

सदर व्यक्तीला ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाल्यानंतर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार सुरू असताना डॉक्टरांना कोरोना विषाणूचा संशय आल्याने चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुढील उपचारासाठी रुग्णाला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, त्यांना निमोनियाचा सुद्धा त्रास झाल्याने स्थिती गंभीर बनली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Today's Horoscope: शुभ संधी की आव्हानांचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

या प्रकरणात आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ही माहिती वेळेत देण्यात आली नव्हती. बुधवारी दुपारपर्यंत आरोग्य यंत्रणेला याची अधिकृत माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्ण आणि मृत्यूची माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या जाणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, आणि नागपूर जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या वाढत आहे. विशेषतः मुंबईत दररोज 100 पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. याउलट, गडचिरोली, वर्धा आणि हिंगोली सारख्या जिल्ह्यांमध्ये तुलनेने रुग्णसंख्या कमी आहे. देशपातळीवर केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये रुग्णवाढ अधिक असून, उत्तर भारतातील राज्यांमध्ये स्थिती तुलनेने स्थिर आहे.

हेही वाचा: Ashadhi Wari 2025: पंढरपूर वारीचं गुपित काय? शेकडो मैल चालणाऱ्या लाखोंच्या श्रद्धेमागचा इतिहास जाणून घ्या

आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरणाची आवश्यक डोस घेण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या वतीने सतर्कतेसाठी उपाययोजना सुरू असून, नागरिकांनी देखील जागरूक राहणे अत्यावश्यक आहे.


सम्बन्धित सामग्री