Kirit Somaiya: भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारली जाऊनही पक्षाप्रती निष्ठा कायम ठेवणाऱ्या सोमय्यांवर भाजपने आता एक विशेष आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र सोमय्या यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.
काय आहे 'मिशन एप्रिल'?
निवडणूक आयोगामार्फत एप्रिल महिन्यापासून मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचे (Voter List Revision) काम हाती घेतले जाणार आहे. मतदार यादीतील दुबार नावे हटवणे आणि अवैध मतदारांची नोंदणी रद्द करणे ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत भाजपचा प्रतिनिधी म्हणून किरीट सोमय्या यांच्यासह 8 अनुभवी नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाने नियुक्त केलेले 'एसआयआर' प्रतिनिधी-
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या यादीत माजी खासदार किरीट सोमय्या, खासदार भागवत कराड, रणधीर सावरकर, मंगेश चव्हाण, सुनील राणे. माधवी नाईक (प्रदेश महामंत्री), रघुनाथ कुलकर्णी (माजी संघटन मंत्री), वासुदेव काळे या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे.
हेही वाचा - Aditi Tatkare Vidhan Sabha : 'ते असताना कणभर जरी प्रशंसा झाली असती तर...', अजित दादांच्या आठवणीमुळे अदिती तटकरेंच्या डोळ्यांत पाणी
खासदारकी हुकली, पण पक्षाने दिला सन्मान
2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीमुळे सोमय्यांचे तिकीट कापले गेले होते, तर 2024 मध्ये समीकरणे बदलूनही त्यांना संधी मिळाली नव्हती. मात्र, संसदीय राजकारणातून बाजूला असूनही सोमय्या रस्त्यावरच्या लढाईत मागे हटलेले नाहीत. सध्या ते राज्यातील बोगस जन्म दाखल्यांचा घोटाळा उघड करण्यासाठी मालेगाव, अकोला आणि अमरावती यांसारख्या शहरांचा दौरा करत आहेत. त्यांची सक्रियता आणि कामाचा आवाका पाहून पक्षाने त्यांच्या अनुभवाचा उपयोग मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.