Nashik Godavari River Flood: गोदामाईने धारण केलं रौद्ररुप; नदी ओलांडू शकते धोक्याची पातळी, सध्या काय परिस्थिती?

पावसाच्या पाण्याची भर पडल्याने होळकर पुलाजवळून एकूण सुमारे 24 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Nashik Godavari River Flood: गोदामाईने धारण केलं रौद्ररुप;  नदी ओलांडू शकते धोक्याची पातळी, सध्या काय परिस्थिती?

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता गोदावरी नदीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच नदीला मोठा पूर आला असून, गंगापूर धरणातून सध्या सुमारे 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यासोबतच पावसाच्या पाण्याची भर पडल्याने होळकर पुलाजवळून एकूण सुमारे 24 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, गोदावरी नदीतील प्रवाह 19 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यानंतर नदी धोक्याची पातळी गाठते. सध्याचा अंदाजित प्रवाह त्यापेक्षा अधिक असल्यामुळे संध्याकाळपर्यंत नदी धोक्याची मर्यादा ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः सराफ बाजार परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रहिवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीची पातळी वाढल्यास या भागात पाणी शिरू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. रामकुंड परिसरातही पुराच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. दुतोंड्या मारुती मंदिराच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचल्याने घाट परिसरातील नागरिक आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाकडून या परिसरावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे तातडीचा धोका आटोक्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीही धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि नदीतील वाढता प्रवाह लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन, महापालिका, पोलीस आणि महसूल विभाग सतर्क असून परस्पर समन्वयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number