जळगावच्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेहोल येथे गहाण ठेवलेली मोटर सायकल सोडविण्यासाठी पैसे मागण्याच्या वादातून आई आणि तिच्या 17 वर्षीय मुलाने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मयत करणसिंग रामसिंग पवार यांनी गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पत्नी अरुणाबाई करणसिंग पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली.
यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी अल्पवयीन मुलानेही वादात हस्तक्षेप केला. पोलिसांच्या माहितीनुसार, या वादातून अरुणाबाई यांनी दोरीने करणसिंग यांचा गळा आवळला, तर 17 वर्षीय मुलाने सायकलच्या पंपाने त्यांच्या डोक्यावर घाव घालत मारहाण केली. यात करणसिंग यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, करणसिंग यांचा याआधी देखील दारू पिऊन त्रास देणे तसेच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून कुटुंबात वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. खून झाल्याची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अरुणाबाई पवार आणि त्यांच्या 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.