छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादातून एका आईने स्वतःच्या 21 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
मृत तरुणीचे नाव नंदिनी धिवरे असे असून ती गेल्या काही वर्षांपासून आईसोबत राहत होती. तिचे पहिले लग्न तुटल्यानंतर ती माहेरीच राहत होती. दरम्यान, तिची ओळख कन्नड येथील एका तरुणाशी झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. नंदिनीला त्या तरुणाशी विवाह करायचा होता; मात्र तिच्या आईला या नात्याला तीव्र आक्षेप होता.
काही दिवसांपासून या विषयावर घरात वाद सुरू होता. अखेर 19 फेब्रुवारी रोजी दुपारी मायलेकीत तीव्र भांडण झाले. नंदिनीने आईच्या आयुष्याविषयी प्रश्न उपस्थित करत स्वतःलाही दुसरे लग्न करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्याचे समजते. या बोलण्यामुळे संतप्त झालेल्या आईने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. घटनेच्या वेळी नंदिनी बाथरूममध्ये होती. याच वेळी आईने संधी साधत तिचा गळा आवळल्याचे तपासात उघड झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून हा प्रकार करण्यात आला. घटनेनंतर मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या गुन्ह्यात सावत्र वडील आणि मामाचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह गादीत गुंडाळून अन्य वस्तूंमध्ये लपवण्यात आला. घर बदलत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी काही घरगुती साहित्यही सोबत घेतल्याचे समजते. मृतदेह दुसरीकडे नेऊन पुरण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे. मात्र, प्रवासादरम्यान रिक्षाचालकाला संशय आल्याने हा कट उघडकीस आला. त्याने तात्काळ पोलिसांना कळवले. सुरुवातीला आरोपींकडून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न झाला; मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला.
चौकशीत आईने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे प्रेमसंबंध, कौटुंबिक तणाव आणि सामाजिक दबाव यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एका आईनेच मुलीचा जीव घेतल्याची ही घटना समाजमनाला चटका लावणारी ठरली आहे.