MPSC student protest: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भोंगळ कारभाराविरोधात आणि आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या तातडीच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील हजारो स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील गरवारे पुलावर एस. एम. जोशी सभागृहाजवळ काल रात्रीपासून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. अध्यक्षांच्या उपस्थितीत निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असा दावा करत इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अध्यक्षांवर तत्काळ कारवाई का केली जात नाही, असा सवाल रोहित पवार यांनी केला.
भाजप आमदारांचा रोहित पवारांवर ‘राजकीय स्टंट’चा आरोप
रोहित पवार यांच्या आंदोलनातील सहभागावर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी कडाडून टीका केली आहे. भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि स्टंटबाजीसाठी सतत आंदोलने करत असल्याचा टोला लगावला.
दुसरीकडे आमदार विक्रम पाचपुते यांनी या आंदोलनाला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC च्या विद्यार्थी प्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या आणि समस्या ऐकून घेतल्या होत्या. त्या बैठकीतील निर्णयानुसार शासनाने तातडीने आदेश जारी करून MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली केली आहे.
हेही वाचा – ‘काही लोक स्वतःच्याच मस्तीत…’; महायुतीत अंतर्गत वाद पेटला, श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर निशाणा
विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत असताना आंदोलनाचा फार्स कशासाठी? भाजपचा थेट सवाल
शासनाने विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्यांची दखल घेऊन कारवाईची प्रक्रिया सुरू केली असतानाही रोहित पवार आंदोलनाचा फार्स का उभा करत आहेत, असा सवाल भाजप आमदारांनी उपस्थित केला आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या शैक्षणिक भविष्याशी कोणताही खेळ होऊ दिला जाणार नाही, असे स्पष्टीकरण भाजप नेत्यांकडून देण्यात आले. दुसरीकडे, केवळ सचिवांची बदली पुरेशी नसून अध्यक्षांवरच कडक कारवाई झाली पाहिजे, या भूमिकेवर आंदोलक विद्यार्थी अजूनही ठाम आहेत. या राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.