महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनजीवनाशी एसटी महामंडळाचे नाते अतूट मानले जाते. गाव ते शहर, तालुका ते जिल्हा अशा दैनंदिन प्रवासासाठी आजही लाखो नागरिक एसटीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासह थकबाकीबाबतही मोठी घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही आता 58 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. यापूर्वी हा भत्ता 53 टक्के होता. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली सुमारे 100 कोटी रुपयांची थकबाकीही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी वित्त विभागाने सहकार्य करावे, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवरही भर दिला जात आहे. तोट्यात चालणाऱ्या मार्गांचे पुनर्मूल्यांकन, प्रवासी संख्येनुसार सेवा नियोजन आणि पर्यटनासाठी विशेष बस सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. महामंडळाचा आर्थिक भार कमी करून सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.
एसटीच्या ताफ्यात नवीन बसांचा समावेश करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 2,640 बस उपलब्ध करून देण्यात आल्या असून दुसऱ्या टप्प्यातील 3 हजार बसांपैकी काही बसांचे वितरण पूर्ण झाले आहे. लवकरच आणखी शेकडो नवीन बस राज्यातील विविध आगारांमध्ये दाखल होणार आहेत. दिवाळीपर्यंत या बसांचे वितरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
याशिवाय आगामी काळात आणखी 5 हजार बसांचा समावेश करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरील खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल. 2027 नंतर एसटीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसांचा समावेश करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे. भविष्यात सध्याच्या तिकीट दरातच अधिक आरामदायी आणि वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय आणि नव्या बस खरेदीचा कार्यक्रम यामुळे महामंडळाच्या भविष्यासाठी आशावाद निर्माण झाला आहे. यामुळे कर्मचारी आणि प्रवासी या दोघांनाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.