पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाणीवरी येथे वऱ्हाडाच्या टेम्पोचा भीषण असा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून 35 पेक्षा अधिक जखमी आहेत. वऱ्हाडाचा टेम्पो हा डहाणूतील बापू गाव येथून धाणीवर येथे साखरपुड्यासाठी येत होता. मात्र धानिवारी येथे विरुद्ध दिशेने येत असतानाच गुजरातहून मुंबईकडे येणारा भरधाव कंटेनर या वऱ्हाडाच्या टेम्पोवरच पलटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालय व वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालघरच्या धाणीवरी येथून वऱ्हाडाचा ट्रक साखरपुड्यासाठी जात होता. त्याचवेळी मुंबई – अहमदाबाद महामार्गावर ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिली. वऱ्हाडाच्या ट्रकमधून 100 पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे साखरपुड्यासाठी निघालेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली नाही. पोलीस सध्या तपास करत आहेत.