मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज मतदानाचा दिवस उजाडला असून, दहिसरमधील वॉर्ड क्रमांक 2 च्या भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर एका वेगळ्याच मनस्थितीत पाहायला मिळाल्या. मतदानासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी आपल्या घरातील मंदिरात मनोभावे पूजा केली. मात्र, पूजा आटोपल्यानंतर जेव्हा त्या दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्या, तेव्हा त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या. पतीच्या आठवणीने त्यांना घरामध्येच रडू कोसळले आणि त्यांनी एकच हुंदका दिला.
अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेनंतर घोसाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, हे दुःख बाजूला सारून तेजस्वी घोसाळकर यांनी राजकीय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. "आजवर प्रत्येक निवडणुकीत अभिषेक माझ्यासोबत असायचा, तोच सर्व धावपळ आणि कामाचे नियोजन करायचा. आज पहिल्यांदाच मला या निवडणुकीला एकटीला सामोरे जावे लागत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली.
हेही वाचा: Nagpur Election : नागपूरमध्ये किती जागांसाठी लढत? मतदारराजाचा कौल कोणाला...जाणून घ्या कोणत्या पक्षांमध्ये चुरशीचा सामना?
निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आजच्या भावूक प्रसंगी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, "जरी अभिषेक आज माझ्यासोबत नसला, तरी त्याची साथ आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत. त्याच्याच प्रेरणेने मी जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरले आहे."
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मधील ही लढत आता संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे. भाजपकडून तेजस्वी घोसाळकर रिंगणात असताना त्यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे गट) कडून धनश्री कोलगे यांनी आव्हान उभे केले आहे. एकेकाळच्या सहकारी असलेल्या या दोन महिला उमेदवारांमधील ही लढत 'निष्ठा विरुद्ध परिवर्तन' अशी मानली जात असून, ही जागा जिंकणे दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
दहिसरच्या या वॉर्डमध्ये सकाळी साडे सात वाजल्यापासूनच मतदारांनी रांगा लावल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांनी आपले मतदान केंद्रावर जाऊन कर्तव्य पार पाडले. आता अभिषेक घोसाळकर यांच्याबद्दलची जनसामान्यांमधील सहानुभूती आणि भाजपची ताकद तेजस्वी यांच्या पदरात यश टाकते की धनश्री कोलगे बाजी मारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा: Maharshtra Election 2026: आमदारालाच मतदान केंद्र शोधायला करावी लागली धावपळ; मंत्री गणेश नाईकांची मतदानासाठी पायपीट