मुंबई: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा शेवटचा दिवस गाठला असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेतून राजकीय भूकंप घडवून आणला आहे. "मराठीच्या नावाने गळा काढणाऱ्या उद्धव ठाकरेंनीच तत्कालीन मुख्यमंत्री असताना राज्यात हिंदी सक्तीची केली होती," असा खळबळजनक दावा करत फडणवीसांनी पुराव्यासह ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मराठी विरुद्ध हिंदी या वादावर भाष्य करताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या काळातील एका अहवालाचा पाढाच वाचून दाखवला.
सभेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांनी त्रिभाषा समिती स्थापन केली होती. 21 सप्टेंबर रोजी याची घोषणा झाली आणि 16 ऑक्टोबर 2020 ला डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. "विशेष म्हणजे, या समितीत उद्धव ठाकरेंचेच उपनेते विजय कदम सदस्य होते. 18 पैकी 16 सदस्य मराठी असूनही या समितीने पहिली ते 12 वी पर्यंत इंग्रजीसोबतच हिंदी भाषा सक्तीची करण्याची शिफारस केली होती," असा दावा फडणवीसांनी केला. 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाला आणि उद्धव ठाकरेंनी त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यताही दिली, असा कागदोपत्री पुरावाच त्यांनी मांडला.
"हे 'गजनी' लोक आहेत, स्वतःच घेतलेले निर्णय स्वतःच विसरतात," अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला. अहवालाच्या 56 व्या पृष्ठावरील शिफारसींचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, ज्या बैठकीत हिंदी सक्तीला मान्यता दिली गेली, त्या बैठकीचे मिनिट्स आणि त्यावरची सही ही खुद्द उद्धव ठाकरेंचीच आहे. "राज ठाकरेजी, तुम्हीही हे ऐकून घ्या, हिंदी सक्तीचे पाप हे उबाठाचेच आहे," असे म्हणत त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना लक्ष्य केले.
महायुती सरकारच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आमच्या सरकारमध्ये फक्त मराठीच सक्तीची आहे. आम्ही कोणावरही कोणतीही भाषा लादलेली नाही. तुम्हाला इतर भाषा शिकण्याची मुभा आहे, पण सक्ती फक्त मायबोली मराठीचीच असेल." उद्धव ठाकरेंचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असून त्यांनीच मराठी माणसाची दिशाभूल केल्याचा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.
या सभेनंतर आता मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच फडणवीसांनी टाकलेल्या या 'हिंदी सक्ती'च्या बॉम्बमुळे ठाकरे गटाची अडचण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता यावर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.