मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत आता रेल्वे प्रवाशांसाठी एक अभिनव सुविधा सुरू होत आहे. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल स्थानकावर भारतातील पहिले डिजिटल लाउंज उभारण्यात येत असून, यामुळे प्रवाशांना युरोपीय थाटाचा अनुभव मिळणार आहे. केवळ प्रवाश्यांसाठीच नव्हे, तर इतर नागरिकांसाठीही हे लाउंज खुले असणार आहे.
या लाउंजच्या माध्यमातून को-वर्किंग स्पेसचा एक अनोखा उपक्रम मुंबईकरांसाठी सुरू होत आहे. कार्यालयीन काम असो की कॉलेजसंबंधी अभ्यास, आता स्टेशनवरच हे सगळं शक्य होणार आहे. प्रवासाच्या वेळी वेळ वाया न घालवता, डिजिटल लाउंजमध्ये बसून ईमेल, मीटिंग्ज, प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट वर्क इत्यादी कामे करता येणार आहेत.
हे लाउंज अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, त्यामध्ये वाय-फाय, चार्जिंग पॉइंट्स, आरामदायक खुर्च्या, वातानुकूलित व्यवस्था आणि साउंडप्रूफ झोन यांचा समावेश आहे. यामुळे एकाच ठिकाणी आराम आणि कामाचा उत्तम समन्वय साधता येईल.
हेही वाचा:नाशिकमध्ये आरोपींसोबत पोलिसांची पार्टी; चार पोलिसांविरुद्ध कारवाई सुरू
पश्चिम रेल्वेचे अधिकारी सांगतात की, 'मुंबई सेंट्रल स्थानकावर ही सोय सुरू करताना प्रवाशांच्या बदलत्या गरजा लक्षात घेतल्या आहेत. लोकांचे आयुष्य जलद गतीने चालले असताना, त्यांना वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करता यावा यासाठी हे पाऊल उचलले आहे.'
देशातील इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवरही अशा प्रकारचे लाउंज उभारण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुसह्य, उत्पादक आणि आधुनिक होईल.
या उपक्रमामुळे केवळ व्यावसायिक प्रवासीच नव्हे, तर विद्यार्थी, फ्रीलान्सर आणि डिजिटल क्रिएटर्स यांच्यासाठीही एक नवे व्यासपीठ निर्माण होणार आहे. सध्या को-वर्किंग स्पेससाठी मोठ्या शहरांमध्ये भरमसाठ दर आकारले जात असताना, रेल्वे स्थानकावर सुलभ दरात ही सेवा मिळणं ही मुंबईकरांसाठी एक आनंदाची बाब ठरणार आहे.
मुंबईत अशी सुविधा सुरू होणं ही एक अभिमानास्पद बाब आहे आणि भविष्यात भारतातील इतर शहरांमध्येही रेल्वे स्थानकांवर डिजिटल लाउंज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या लाउंजच्या स्थापनेमुळे मुंबई सेंट्रल स्थानकाची ओळख केवळ एक प्रवास केंद्र म्हणून न राहता, ते एक डिजिटल स्मार्ट स्पेस म्हणूनही विकसित होणार आहे.