Monday, February 09, 2026 02:53:14 PM

Mumbai Local Trains: मेल-एक्सप्रेसला 'रेड कार्पेट' आणि लोकल प्रवाशांना 'वेळकाढूपणा'; प्रवाशांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळाली उडवाउडवीची उत्तरं, काय घडलंय नेमकं?

लोकल रेल्वे गाड्यांना सातत्याने होणारा विलंब, फेऱ्या रद्द होणे आणि पूर्वसूचनेचा अभाव याविरोधात प्रवासी संघटनांनी थेट रेल्वे मुख्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.

mumbai local trains मेल-एक्सप्रेसला रेड कार्पेट आणि लोकल प्रवाशांना वेळकाढूपणा प्रवाशांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळाली उडवाउडवीची उत्तरं काय घडलंय नेमकं

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी मध्य रेल्वे सध्या प्रवाशांसाठी डेडलाईन ठरत आहे. 1 जानेवारीपासून लोकल गाड्यांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला असून, त्रस्त झालेल्या प्रवाशांच्या संतापाचा आता कडेलोट झाला आहे. सातत्याने होणारा विलंब आणि रेल्वे प्रशासनाची उदासीनता याविरोधात प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळाने थेट मध्य रेल्वेच्या मुख्यालयात धडक दिली. “लोकल गाड्यांचे वेळापत्रक पाळा , नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा,” अशा जळजळीत शब्दांत शिष्टमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

दुपारच्या सत्रात लोकल फेऱ्या विलंबाने धावणे, ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या फेऱ्या अचानक रद्द करणे आणि प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न मिळणे, यामुळे रेल्वेचा प्रवास म्हणजे एक शिक्षा बनली आहे. त्यातच मध्य रेल्वेवरील AC लोकल म्हणजे जादा पैसे भरून विकतचे दुखणे असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे. या गंभीर परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी प्रवासी संघटनांनी मुख्य प्रवासी परिवहन व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि वरिष्ठ परिचालन प्रबंधक अनंत शर्मा यांची भेट घेत प्रशासनाच्या बेशिस्त कारभारावर ताशेरे ओढले.

हेही वाचा: Republic Day Parade 2026 : घडणार इतिहास! प्रजासत्ताक दिन संचलनात घुमणार महिला 'अग्निवीरांचा' आवाज

मेल-एक्स्प्रेसचा ‘रेड कार्पेट’ अन् लोकल प्रवाशांचा ‘वनवास’

कसारा आणि कर्जत या लांब पल्ल्याच्या मार्गांवर लोकल रोज अर्धा तास उशिराने धावत आहेत. यामुळे चाकरमान्यांचे कार्यालयीन काम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. केवळ मेल एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी लोकल प्रवाशांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला. रखडलेले प्रकल्प आणि नियोजनाचा अभाव याचा फटका दररोज लाखो प्रवाशांना बसत असताना, प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

अधिकाऱ्यांची आश्वासनांची ‘बोळवण’

प्रवाशांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे “टप्प्याटप्प्याने सुधारणा करू” असे सरकारी उत्तर दिले. “15 डबा लोकलसाठी फलाटांचे काम सुरू असून विकासात्मक कामांमुळे हा विलंब होत आहे,” असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, गेल्या 15 वर्षांत कसारा मार्गावर एकही नवीन लोकल वाढलेली नाही, या वस्तुस्थितीवर अधिकाऱ्यांकडे कोणतेही ठोस उत्तर नव्हते.

कल्याण - कसारा - कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी आक्रमक भूमिका घेत टिटवाळा - कसारा लोकल सुरू करण्याची आणि रद्द केलेल्या मेल - एक्स्प्रेसचे थांबे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने तातडीने सुधारणा केल्या नाहीत, तर हा संताप आगामी काळात रेल्वे रुळांवर आंदोलनाच्या रूपाने उतरेल, असा थेट इशाराही देण्यात आला आहे. आता तरी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या इशारा पत्राची दखल घेतात की मुंबईकरांचा प्रवास असाच वाऱ्यावर राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Border 2 Shows Cancelled: 'बॉर्डर 2' ला प्रदर्शनाच्या दिवशीच मोठा धक्का; 'या' कारणामुळे देशभरातील मॉर्निंग शो रद्द


सम्बन्धित सामग्री