मुंबई: 'स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई' हे केवळ भिंतीवरचे घोषवाक्य न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेबाबत शिस्त लावण्यासाठी पालिकेने नव्या आणि अत्यंत कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू केली असून, आता नियमांकडे दुर्लक्ष करणे मुंबईकरांना चांगलेच महागात पडणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी पालिकेने स्वतंत्र 'उपविधी' लागू केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
'घनकचरा व्यवस्थापन उपविधी 2025' चा चाबूक
मुंबई महापालिकेने ‘घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी 2025’ जाहीर केले आहेत. या नवीन नियमावलीत एकूण 21 ठोस मुद्द्यांचा समावेश करण्यात आला असून, हे नियम केवळ सर्वसामान्य नागरिकांपुरते मर्यादित नसून व्यापारी संस्था, शैक्षणिक संकुले आणि गृहनिर्माण सोसायट्यांवरही बंधनकारक असतील. आता रस्त्यावर किंवा पदपथावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणे, लघवी किंवा शौच करणे यांसारख्या बेशिस्त कृत्यांना पूर्णपणे अटकाव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी अंघोळ करणे किंवा कपडे धुणे यावरही आता बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा: Mayor Election: महापौर' ठरला! अखेरच्या क्षणी 'या' नेत्याने टाकली गुगली; पाहा कोणाची लागली वर्णी
कचरा वर्गीकरणाचा 'नियम' आता अनिवार्य
केवळ कचरा टाकू नका असे म्हणून न थांबता, पालिकेने कचरा वर्गीकरणावर (Segregation) विशेष भर दिला आहे. घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर ओला व सुका कचरा वेगळा करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. मोठ्या संस्था, मॉल्स आणि धार्मिक स्थळांना या नियमातून कोणतीही सूट मिळणार नाही. यासोबतच, शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या 'राडारोडा' (Debris) माफियांवरही पालिकेची करडी नजर असणार आहे. विनापरवाना राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट जप्तीची कारवाई होऊ शकते. या मोहिमेचे थेट नियंत्रण उपायुक्त किरण दिघावकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
दंडाचा आकडा वाचूनच फुटेल घाम!
नवीन नियमावलीनुसार, दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलात, तर 250 रुपये दंड भरावा लागेल. रस्त्यावर कचरा फेकल्यास 500 रुपये, तर कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास वैयक्तिक स्तरावर 200 रुपये आणि मोठ्या संस्थांना एक हजार रुपये दंड आकारला जाईल.
धक्कादायक म्हणजे, व्यावसायिक कारणांसाठी कचरा जाळल्यास थेट 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच, पाळीव प्राण्यांमुळे सार्वजनिक जागा अस्वच्छ झाल्यास मालकाकडून एक हजार रुपये वसूल केले जातील. फेरीवाल्यांमुळे कचरापेटी नसल्यास किंवा कचरा वर्गीकरण त्यांनी केले नाही तर त्यांच्याकडून 750 रुपये दंड आकारला जाणार आहे.
मोकळ्या जागी प्राणी पक्षांना खायला दिल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बांधकाम आणि पाडकाम कचरा अधिकृतपणे टाकणे यासाठी 20 हजार रुपये तर विनापरवाना राडारोडा वाहतूक 25 हजार दंड आकारण्यात येणार आहे.
शिस्त हीच स्वच्छतेची गुरुकिल्ली
या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, केवळ दंड आकारणे हा यामागचा उद्देश नसून, मुंबईकरांमध्ये नागरी शिस्त रुजवणे हे मुख्य ध्येय आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. "तुमचा परिसर, तुमची जबाबदारी" या भावनेतून मुंबईकरांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: Donald Trump: वॉशिंग्टनमध्ये उभारणार भारतासारखं 'इंडिया गेट'? डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने सोशल मेडियावर उडाली खळबळ