Fake Train Pass: मुंबई लोकलला ‘शहराची जीवनवाहिनी’ म्हटलं जातं. रोज लाखो प्रवासी या रेल्वेवर अवलंबून असतात आणि त्यासाठी रेल्वे प्रशासन प्रवाशांची काटेकोर तिकीट तपासणी करत असतं. मात्र, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत काही जण त्याचा गैरवापर करून नियम मोडण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. अशाच एका प्रकरणात कृत्रिम प्रज्ञेचा (AI) उपयोग करून बनावट वातानुकूलित लोकल पास तयार करणाऱ्या अंबरनाथ येथील दाम्पत्यावर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई मध्य रेल्वेच्या AC लोकलमध्ये नियमित तिकीट तपासणीदरम्यान उघड झाली. तिकीट तपासणीस विशाल नवले हे कल्याण–सीएसएमटी AC लोकलमध्ये प्रवाशांच्या पासची तपासणी करत होते. त्यावेळी एका महिला प्रवाशाने मोबाईलमध्ये दाखवलेला पास त्यांना संशयास्पद वाटला. पास वैध असल्याचे दिसत असले तरी तो रेल्वेच्या अधिकृत UTS App मधून उघडलेला नसून गुगल क्रोम ब्राउझरमधून दाखवण्यात आला होता. यामुळे तिकीटावरील QR कोड दिसत नव्हता. या तांत्रिक त्रुटीमुळे नवले यांच्या मनात शंका निर्माण झाली.
तपासणी पुढे नेत त्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असता, अशा क्रमांकाचा पास UTS सिस्टीममध्ये अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महिलेला डोंबिवली स्थानकात उतरवून आरपीएफ जवानांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तिने धक्कादायक माहिती दिली; हा पास तिने स्वतः तयार केलेला नसून तिच्या पतीने कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून बनवून दिला असल्याची कबुली तिने दिली.
महिलेचे नाव गुडिया ओमकार शर्मा (28) असून ती मुंबईतील एका खासगी बँकेत विक्री व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तिचे पती ओमकार आनंदी शर्मा (30) हे अभियंता असून त्यांना संगणकीय कोडिंगचे चांगले ज्ञान आहे. या तांत्रिक कौशल्याचा गैरवापर करून त्यांनी AC लोकलचा डिजिटल पास हुबेहुब तयार केला होता, असे पोलिस तपासात समोर आले.
याबाबत तक्रार नोंदवून दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि रेल्वे नियमांचे उल्लंघन या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. दाम्पत्याकडून मोबाईल आणि डिजिटल फाइल्स जप्त करून पुढील चौकशी सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाकडून अशाप्रकारच्या बनावट डिजिटल पास प्रकरणांना गंभीर गुन्हा मानले जाते. UTS App मध्ये QR कोड आणि बॅकएन्ड सर्व्हरची रिअल टाइम पडताळणी असल्याने बनावट पास तयार करणे कठीण आहे; मात्र AI आणि सॉफ्टवेअर एडिटिंगचा वापर करून केलेला हा प्रकार रेल्वे सुरक्षा यंत्रणेसाठीही चिंता वाढवणारा आहे.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना इशारा दिला आहे की, तिकीट किंवा पास फक्त अधिकृत UTS अॅप किंवा काउंटरमधूनच खरेदी करावा. तांत्रिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.