मुंबई : न्यायाच्या मंदिरात रोज अनेकांचे भाग्य बदलते, पण गुरुवारी घडलेली एक घटना संपूर्ण कायदा क्षेत्राला हादरवून गेली. किल्ला कोर्टात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वरिष्ठ महिला वकील मालती रमेश पवार (वय 59) यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, कोर्ट परिसरात त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे अनेक सहकारी होते, पण कोणी मदतीचा हात पुढे केला नाही. मालती पवार या मुंबईतील नामांकित वकील होत्या. त्या फॅमिली कोर्ट, बॉम्बे हायकोर्ट आणि विविध स्थानिक न्यायालयांमध्ये वरिष्ठ वकील आणि मध्यस्थ म्हणून काम पाहत होत्या.
गुरुवारी त्या एका केसची प्रत घेण्यासाठी किल्ला कोर्टात आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्या कोर्टाच्या बार रूममध्ये थोडा वेळ विश्रांतीसाठी गेल्या, पण काही क्षणातच त्या कोसळल्या. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली. या क्षणी सर्वांत वेदनादायक गोष्ट म्हणजे, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. कोणीही त्यांना सीपीआर दिलं नाही, किंवा तातडीने रुग्णालयात घेवून गेलं नाही. उलट काही लोक त्या अवस्थेतही व्हिडिओ शूट करत होते. काही मिनिटांतच मालती पवार यांचा श्वास थांबला आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचे निधन झाले.
हेही वाचा: Uddhav Thackrey On Farmers' Aid: शेतकऱ्यांची थट्टा थांबवा! उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार प्रहार
त्यांचे पती रमेश पवार यांनी वेदनादायी शब्दांत आपली व्यथा मांडली. “संध्याकाळी साधारण साडेसहा वाजता मला आझाद मैदान पोलिस ठाण्यातून फोन आला की, माझ्या पत्नीला कामा रुग्णालयात नेलं आहे. पण मी पोहोचण्याआधीच सगळं संपलं होतं. ती स्ट्रेचरवर होती... तिची बॅग बाजूला ठेवलेली होती... पण तिच्या जवळ एकही सहकारी नव्हता,” असे ते भावनिक होत म्हणाले. वकील सुनील पांडे यांनी मुंबईतील सर्व न्यायालयांमध्ये वकिलांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि प्रथमोपचार व्यवस्था सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात अकाल मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस तपास करत आहेत. मात्र या घटनेने मुंबईतील न्यायालयांमधील वैद्यकीय सुविधांचा अभाव उघड केला आहे. वकिलांची संघटना आणि सहकारी यांच्यातही संतापाची भावना व्यक्त होत आहे. मालती पवार यांचा मृत्यू हे केवळ नुसता एखाद्या कुटुंबाचे दुःख नाही, तर न्याय व्यवस्था परिसरातील मानवी संवेदनांच्या अभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हेही वाचा: OPEC+ Oil Output: धक्कादायक ! आठ देशांच्या 'या' निर्णयामुळे भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर होणार परिणाम