Friday, March 13, 2026 10:26:11 PM

Mumbai AC Local: हार्बर लाईनवर महिन्याभरापासून वेळापत्रक कोलमडले, एसी लोकलमुळे प्रवाशांचा पारा चढला

यामुळे नियमित प्रवाशांचा मनस्ताप वाढला असून वेळापत्रक विस्कळीत झाल्याची तक्रार प्रवासी संघटनांनी केली आहे.

mumbai ac local हार्बर लाईनवर महिन्याभरापासून वेळापत्रक कोलमडले एसी लोकलमुळे प्रवाशांचा पारा चढला

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेच्या ताफ्यात जेव्हा 'एसी लोकल' दाखल झाली, तेव्हा प्रवाशांना उकाड्यापासून सुटका आणि सुखद प्रवासाची स्वप्ने पडली होती. मात्र, हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी हा थंडावा आता चांगलाच 'तापदायक' ठरू लागला आहे. मुळातच केवळ दोन मार्गिकांच्या मर्यादेत अडकलेल्या हार्बर रेल्वेवर एसी लोकलचे आगमन झाल्यापासून नियमित उपनगरी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. कार्यालयात वेळेवर पोहोचण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्यांसाठी ही वातानुकूलित सेवा सुविधेऐवजी 'अडथळा' ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून हार्बर मार्गावर मोठ्या दिमाखात एसी लोकलची सेवा सुरू करण्यात आली. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेसह एकूण 14 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवसापासूनच या गाड्यांनी रेल्वे प्रशासनाची आणि प्रवाशांची कसोटी पाहिली आहे. तांत्रिक बिघाड आणि दरवाज्यांच्या समस्यांमुळे सध्या हार्बरवरील एसी आणि सामान्य लोकल सातत्याने 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गाची रचना अशी आहे की, एका गाडीला विलंब झाला तर त्याचा परिणाम मागून येणाऱ्या सर्व गाड्यांवर होतो, ज्यामुळे संपूर्ण मार्गच विस्कळीत होत आहे.

वातानुकूलित लोकलचे सर्वात मोठे तांत्रिक वैशिष्ट्य असलेले 'स्वयंचलित दरवाजे' सध्या हार्बरसाठी मुख्य डोकेदुखी ठरत आहेत. मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर यांसारख्या अफाट गर्दीच्या स्थानकांवर प्रवासी गाडीच्या दरवाज्यातच उभे राहतात. जोपर्यंत दरवाजे पूर्णतः बंद होत नाहीत, तोपर्यंत ही गाडी पुढे सरकत नाही. त्यातच काही तांत्रिक त्रुटींमुळे दरवाजे उघडण्या-मिटण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. परिणामी, गाडी नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ फलाटावर रेंगाळते. 'अंगाला थंडावा, पण जीवाला मनस्ताप' अशी काहीशी अवस्था सध्या प्रवाशांची झाली आहे.

हेही वाचा: Stock Market Today: गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली! सलगच्या तेजीनंतर बाजारात घसरण, निफ्टीही घसरला

प्रवासी संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मध्य रेल्वेने केवळ तांत्रिक कारणे पुढे करण्यापेक्षा ठोस उपाययोजना कराव्यात," अशी मागणी प्रवासी प्रतिनिधी करत आहेत. गर्दीच्या स्थानकांवर आरपीएफ (RPF) कर्मचारी नियुक्त करून दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी आणि डब्यांमधील तांत्रिक दोष दूर करण्यासाठी 'आयसीएफ'ला (ICF) तातडीने पाचारण करावे, असेही त्यांनी सुचवले आहे. पश्चिम रेल्वेवर जर याच बनावटीच्या गाड्या यशस्वी ठरत असतील, तर हार्बरच्या प्रवाशांनाच या मनस्तापाला सामोरे का जावे लागत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

या विलंबाचा फटका केवळ रेल्वेच्या रुळांवरच नाही, तर तिकीट खिडक्यांवरही बसत आहे. एसी लोकल वारंवार उशिराने धावत असल्याने किंवा ऐनवेळी रद्द होत असल्याने संतप्त प्रवासी तिकीट खिडकीवर जाऊन परताव्याची (Refund) मागणी करत आहेत. यामुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्यात खटके उडत आहेत. वाद टाळण्यासाठी आता रेल्वे कर्मचारी तिकीट देण्यापूर्वीच प्रवाशाला "तुम्हाला खरंच एसीने प्रवास करायचा आहे ना?" असा सवाल विचारून खात्री करून घेत आहेत. रेल्वेच्या इतिहासात प्रवाशाला खात्री करून तिकीट देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

रेल्वे प्रशासन या समस्येवर वेळीच उपाय  शोधणार की हार्बरचा प्रवास असाच 'विलंबाच्या वाटेवर' राहणार, याकडे आता सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन 'एसी'चा प्रवास खऱ्या अर्थाने सुखकर करण्याची गरज आहे.

हेही वाचा: Crime News: कौर्याची परिसीमा, वडिलांवर गोळी झाडली मग स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन केली बेपत्ता असल्याची तक्रार; कारण ऐकून सर्व थक्क


सम्बन्धित सामग्री