Monday, May 11, 2026 12:01:21 PM

Mumbai AC Local: मुंबईची 'लाईफलाईन' आता सुरक्षित ट्रॅकवर; स्वयंचलित दरवाजांच्या लोकलचे मुंबईकडे प्रस्थान

मुंब्रा दुर्घटनेनंतर घेतलेल्या या निर्णयामुळे लोकल प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसह्य होण्याची अपेक्षा आहे.

mumbai ac local मुंबईची लाईफलाईन आता सुरक्षित ट्रॅकवर स्वयंचलित दरवाजांच्या लोकलचे मुंबईकडे प्रस्थान

मुंबईची 'लाईफलाईन' असलेली लोकल म्हणजे रोजचा जगण्या-मरण्याचा संघर्ष. लोकलच्या दारात लटकून प्रवास करणे ही मुंबईकरांची मजबुरी असली, तरी याच मजबुरीने आजवर अनेकांचे बळी घेतले आहेत. घराबाहेर पडलेला माणूस सुखरूप परत येईलच याची शाश्वती नसलेला हा प्रवास आता काहीसा सुसह्य होण्याची चिन्हे आहेत. मध्य रेल्वेच्या सर्वसामान्य प्रवाशांची अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, स्वयंचलित दरवाजे असलेली 12 डब्यांची विनावातानुकूलित (Non-AC) लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेने दिमाखात रवाना झाली आहे.

गतवर्षी, 9 जून 2025 रोजी मुंब्रा स्थानक परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी या धावत्या लोकलच्या दारातून पडून तब्बल 13 प्रवासी जखमी झाले होते, तर चार निष्पाप प्रवाशांना त्यांचा जीव गमवावा लागला होता.

या हृदयद्रावक घटनेनंतर प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. वाढता जनरोष आणि सुरक्षेचा ऐरणीवर आलेला मुद्दा पाहता, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने मुंबईकरांसाठी विना-एसी स्वयंचलित दरवाजांच्या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर 2025 मध्येच ही गाडी दाखल होणे अपेक्षित होते, मात्र 'देर आये दुरुस्त आये' या उक्तीप्रमाणे, एप्रिल 2026 मध्ये ही लोकल अखेर मुंबईच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

हेही वाचा: Google Pay Pocket Money 'गूगल पे'चे 'पॉकेट मनी' फिचर कसं काम करतं? अफवा खऱ्या की खोट्या?

चेन्नईहून निघालेली ही अत्याधुनिक लोकल मुंबईत दाखल होताच थेट प्रवासी सेवेत रुजू होणार नाही. सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता, सर्वप्रथम 'रिसर्च डिझाईन अँड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन' कडून या गाडीची कसून तपासणी केली जाईल. रेल्वेगाडीची स्थिरता, वेग आणि तांत्रिक सुरक्षितता या निकषांवर चाचण्या पार पडल्यानंतर, प्रत्यक्ष प्रवाशांना सोबत घेऊन 'पॅसेंजर ट्रायल' घेतली जाईल. या सर्व तांत्रिक अग्निदिव्यातून यशस्वीरीत्या पार पडल्यानंतरच ही लोकल अधिकृतपणे सेवेत दाखल करण्याचा अंतिम निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेतला जाणार आहे.

बंद दरवाजांच्या लोकलचा उल्लेख येताच मुंबईकरांच्या मनात साहजिकच 2019 च्या पश्चिम रेल्वेवरील अयशस्वी प्रयोगाच्या आठवणी ताज्या होतात. खचाखच भरलेल्या लोकलचे दरवाजे बंद झाल्यास आतमध्ये प्रवासी गुदमरून मृत्युमुखी पडतील, या रास्त भीतीने तो प्रयोग बारगळला होता. मात्र, नव्या लोकलची बांधणी करताना या गंभीर त्रुटीवर विशेष अभ्यास करण्यात आला आहे. मुंबईतील अलोट गर्दीचा विचार करून, प्रवाशांना श्वास घेण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी वायुविजन यंत्रणेची (व्हेंटिलेशन) अचूक सोय करण्यात आली आहे. या नव्या लोकलचे दरवाजे संपूर्णपणे बंदिस्त नसून, ते 'सछिद्र आणि पट्ट्यांचे' असणार आहेत, जेणेकरून डब्यात हवा खेळती राहील.

या नव्या रेल्वेचे आणखी एक जमेचे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची 'व्हेस्टिब्युल्ड' रचना. या लोकलचा प्रत्येक डबा आतून अन्य डब्यांना जोडलेला असणार आहे. सध्याच्या पारंपारिक लोकलमध्ये एका डब्यात पाय ठेवायला जागा नसते, तर दुसऱ्या डब्यात तुलनेने गर्दी कमी असते. परंतु, नव्या जोडणीमुळे प्रवाशांना आतल्या आत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येईल, ज्यामुळे संपूर्ण गाडीत गर्दी समान रित्या विभागली जाण्यास मोठी मदत होणार आहे.

एकूणच, ही नवी स्वयंचलित लोकल केवळ एक तांत्रिक बदल नसून, मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासाच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे आणि आश्वासक पाऊल आहे. मुंब्रा दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती टाळण्यासाठी उचललेले हे पाऊल भविष्यात मुंबईच्या धावपळीच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरक्षिततेचे कवच देईल, यात शंका नाही. आता फक्त प्रतीक्षा आहे ती ही लोकल सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी होऊन प्रत्यक्ष रुळांवर धावण्याची! 

हेही वाचा: Bhayandar Fire: काळरात्र! भाईंदरमध्ये झोपडपट्ट्या भस्मसात, आगीत एकापाठोपाठ एक सिलिंडरचे स्फोट; मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती


सम्बन्धित सामग्री