Saturday, March 07, 2026 06:01:09 AM

Mumbai Local Mega Block: मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी 'मेगाब्लॉक'; प्रवाशांनो प्रवास करताना वेळापत्रक बघाच

अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील तसेच काही स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

mumbai local mega block मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक प्रवाशांनो प्रवास करताना वेळापत्रक बघाच

मुंबईकरांच्या हक्काच्या सुट्टीच्या दिवशी, म्हणजेच रविवारी, रेल्वे प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे रुळांची देखभाल आणि सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही मार्गांवर उद्या 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेणे फायद्याचे ठरेल, अन्यथा प्रवासाचा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

हार्बर मार्ग: पनवेल-वाशी दरम्यान प्रवाशांची कसोटी

हार्बर मार्गावरही प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे. पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11 वाजून 5 मिनिटे ते दुपारी 4 वाजून 5 मिनिटांपर्यंत पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून, CSMT ते बेलापूर-पनवेल आणि ठाणे ते पनवेल या फेऱ्या पूर्णपणे रद्द राहतील. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने CSMT ते वाशी आणि ठाणे ते वाशी-नेरूळ दरम्यान विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, खारकोपर-उरण मार्गावरील लोकल फेऱ्या मात्र नियोजित वेळापत्रकानुसारच धावणार आहेत.

मध्य रेल्वे: मुख्य आणि हार्बर मार्गावर वेळापत्रक कोलमडणार

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10 वाजून 55  मिनिटे ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. या काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी हे लक्षात घ्यावे की, यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून उर्वरित गाड्या विलंबाने धावतील. पर्यायाने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Sindhudurg Zilla Parishad Election 2026 : चार वर्षांनंतर जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणारा नवा श्वास; सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय इतिहास जाणून घ्या

पश्चिम रेल्वे: 'या' दोन स्थानकांवर लोकल थांबणार नाही!

पश्चिम रेल्वेवर उद्या सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. या काळात सर्व धीम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. विशेष म्हणजे, विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांत फलाट उपलब्ध नसल्याने तिथे लोकल थांबणार नाहीत. या दोन स्थानकांवरील प्रवाशांसाठी हार्बर मार्ग हा एकमेव पर्याय उपलब्ध असेल. वेळेचे गणित मांडूनच प्रवाशांनी या मार्गावर प्रवास करावा, जेणेकरून अंतिम स्थानी पोहोचण्यास उशीर होणार नाही.

अतिक्रमणांवर हातोडा: रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या कामासोबतच मध्य रेल्वेने आता अतिक्रमणांचे 'ग्रहण' सोडवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. कुर्ला-ट्रॉम्बे मार्गिकेलगत असलेल्या तब्बल 3,154 अतिक्रमित झोपड्यांना रेल्वे प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. येत्या 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान या झोपड्या हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. रेल्वेच्या जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे हटवून रेल्वे मार्गिका मोकळी करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला

एकंदरीतच, उद्याचा रविवार मुंबईकरांसाठी प्रवासाच्या दृष्टीने काहीसा 'थकवणारा' ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कामासाठी हे ब्लॉक अनिवार्य असले, तरी प्रवाशांनी शक्य असल्यास प्रवासाचे नियोजन टाळावे किंवा रेल्वेने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. डिजिटल ॲप्स आणि रेल्वेच्या सूचनांचे पालन करून तुमचा रविवार सुरक्षित आणि नियोजित ठेवा.

हेही वाचा: Rantnagiri Panchayat Samiti Election 2026: रत्नागिरीचा 'कौल' कोणाला? 56 गट आणि 112 गणांसाठी आज रणसंग्राम; उदय सामंत, भास्कर जाधवांसह 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला


सम्बन्धित सामग्री