मुंबईची 'लाईफलाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेचे चाक आज शनिवार आणि रविवारी काहीसे मंदावणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती आणि मेट्रो-6 च्या गर्डर बसवण्याच्या महत्त्वाकांक्षी कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने 'मेगाब्लॉक'चा पर्याय निवडला आहे. विशेषतः मध्य रेल्वेवर तब्बल 15 तासांचा जम्बो ब्लॉक घोषित करण्यात आल्याने मुंबईकरांच्या विकेंडच्या नियोजनावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामांचा डोंगर कमी करण्यासाठी रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारा ठरेल.
मध्य रेल्वेवर शनिवारी दुपारी 12 वाजेपासून ते थेट रविवारी पहाटे 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर 15 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकचा सर्वाधिक फटका आसनगाव ते कसारा दरम्यानच्या प्रवाशांना बसणार आहे. या वेळेत कसारा लोकल उपलब्ध नसून, गाड्या टिटवाळा आणि आसनगाव स्थानकातूनच माघारी वळवण्यात येतील. केवळ लोकलच नव्हे, तर 35 मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही याचे सावट असून, अनेक गाड्या रद्द किंवा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
या ब्लॉकमुळे काही प्रमुख गाड्यांच्या मार्गात मोठे फेरबदल झाले आहेत. शनिवारी धावणारी सीएसएमटी-धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस (11011/12) पूर्णपणे रद्द असेल, तर हुजूरसाहेब नांदेड-सीएसएमटी एक्स्प्रेस (17611/12) मनमाडपर्यंतच धावेल. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने ब्लॉकपूर्वीची शेवटची आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल यांची वेळ जाहीर केली असली, तरी सर्व लोकल फेऱ्या किमान 20 मिनिटे विलंबाने धावणार असल्याने स्थानकांवर गर्दीचा महापूर येण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा: Iran US Talk: अमेरिका-इराणमध्ये दुसऱ्यांदा होणार चर्चा, समोरासमोर नाही तर 'या' माध्यमातून साधणार संवाद
केवळ मध्य रेल्वेच नव्हे, तर हार्बर मार्गावरही रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान ब्लॉक असेल. यामुळे नवी मुंबई आणि वांद्रे-गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागेल. सुदैवाने, रविवारी दिवसा सीएसएमटी ते कल्याण दरम्यान कोणताही ब्लॉक नसल्याने मुख्य मार्गावरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, देखभालीच्या कामांमुळे एकूणच रेल्वेच्या वेगावर परिणाम होणार हे निश्चित आहे.
पश्चिम रेल्वेवरही परिस्थिती वेगळी नाही. जोगेश्वरी ते राम मंदिर दरम्यान सहाव्या मार्गिकेवर मेट्रो-6 च्या कामासाठी आणि दहिसर येथे पादचारी पुलाच्या गर्डरसाठी 10 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री 10.15 ते रविवारी सकाळी 8.15 या कालावधीत 55 लोकल फेऱ्या रद्द राहतील. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या आणि पहाटे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांसाठी हे मोठे आव्हान असेल. मेट्रोच्या कामासाठी ही तांत्रिक अडचण अपरिहार्य असली, तरी प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्या अंधेरी-बोरीवली दरम्यान वळवण्यात आल्या आहेत.
एकूणच, या शनिवार-रविवारी मुंबईकरांनी रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना 'वेळेचे गणित' नीट मांडणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी प्रवाशांनी शक्य असल्यास महत्त्वाच्या कामाशिवाय प्रवास टाळावा किंवा अधिक वेळ घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे. रेल्वेच्या या दुरुस्ती कामामुळे भविष्यातील प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल, हीच सध्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब आहे.
हेही वाचा: Raghav Chadha: भाजपामध्ये प्रवेश केला खरा पण तांत्रिक नियमांत 'आप'चे बंडखोर खासदार अडकणार; राघव चड्ढा अडचणीत येणार?