Thursday, February 12, 2026 03:32:23 AM

Local Train CCTV: मुंबई लोकलचा 'तिसरा डोळा' आता ट्रॅकवर; अपघात आणि वादांवर सीसीटीव्हीची करडी नजर

बहुतांश लोकलमध्ये हे कॅमेरे कार्यान्वित झाले असून, यामुळे चौकशीत पारदर्शकता आणि मोटरमनचे संरक्षण सुनिश्चित होणार आहे.

local train cctv मुंबई लोकलचा तिसरा डोळा आता ट्रॅकवर अपघात आणि वादांवर सीसीटीव्हीची करडी नजर

मुंबई: धावत्या लोकलसमोर अचानक आलेला अडथळा असो वा रुळांवरील दुर्दैवी आत्महत्या, आता प्रत्येक घटनेचा योग्य तोच निर्णय होणार आहे. मुंबई लोकलच्या मोटरमन केबिनबाहेर हाय टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या ताफ्यातील बहुतांश लोकलमध्ये हे 'तिसरे डोळे' कार्यान्वित झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे आता केवळ 'जबाबा'वर अवलंबून न राहता रेल्वे प्रशासनाकडे प्रत्यक्ष पुराव्यांची शिदोरी उपलब्ध असणार आहे.

रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मागवलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एकूण 164 गाड्यांपैकी 161 गाड्यांच्या केबिनबाहेर हे अत्याधुनिक कॅमेरे बसवून ते सुरू करण्यात आले आहेत. रुळांवर होणारे अपघात, तांत्रिक बिघाड किंवा अनपेक्षित अडथळ्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांच्या विश्लेषणासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पूर्वी केवळ प्रत्यक्षदर्शी किंवा मोटरमनचा जबाब हाच तपासाचा आधार असायचा, ज्यात अनेकदा तफावत आढळायची. आता मात्र, उच्च दर्जाचे फुटेज अपघाताचे नेमके 'मूळ' शोधण्यास मदत करेल.

हेही वाचा: Chandrapur District Politics: चंद्रपूरचं राजकारण तापलं; वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील 'कोल्ड वॉर' थांबवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचे शर्थीचे प्रयत्न

हे सीसीटीव्ही केवळ रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीच नाही, तर मोटरमनच्या संरक्षणासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत. अनेकदा अपघातानंतर प्राथमिक संशयाची सुई मोटरमनकडे वळते. मात्र, या कॅमेऱ्यांमुळे सिग्नल यंत्रणेतील त्रुटी, बाह्य अडथळे किंवा तांत्रिक बिघाड स्पष्टपणे दिसणार आहेत. "प्रत्यक्ष पाहावे तेव्हाच खरे मानावे" या उक्तीप्रमाणे, कोणत्याही पुराव्याशिवाय मोटरमनवर होणारे आरोप आता या फुटेजमुळे खोडले जातील, ज्यामुळे तपासात पारदर्शकता आणि अचूकता येईल.

मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार,15 डब्यांच्या 162 आणि काही विशेष अशा एकूण 164 लोकल आहेत. त्यापैकी 163 केबिनमध्ये कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. हे कॅमेरे केवळ समोरचा रस्ताच नाही, तर रुळांच्या आसपासच्या परिसराचाही वेध घेण्यास सक्षम आहेत. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास ती नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचे अचूक विश्लेषण करणे तांत्रिक समितीला सोपे होणार आहे.

मुंबईच्या जीवनवाहिनीवर अनेकदा रुळ ओलांडताना होणारे अपघात किंवा आत्महत्येसारख्या धक्कादायक घटना घडतात. अशा वेळी प्रशासकीय चौकशीत वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पीडितांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी हे फुटेज मोलाचे ठरेल. रेल्वेचे हे पाऊल आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रवाशांचा प्रवास आणि कर्मचाऱ्यांची कर्तव्यपूर्ती अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने पडलेले एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा: Raj & Uddhav Thackeray : 'मनसेने असं का केलं? त्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता' मनसेच्या 'त्या' निर्णयावर उद्धव ठाकरे नाराज; नेमकं प्रकरण काय?


सम्बन्धित सामग्री