BMC Gift 105 E-Bikes to Mumbai Dabbawalas : मुंबईची जीवनवाहिनी समजले जाणारे डबेवाले आता सायकलवरून थेट ई-बाईकवर स्वार होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी वांद्रे येथील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’ला भेट दिली असता, डबेवाल्यांसाठी 105 ई-बाइक्स देण्याची मोठी घोषणा केली. गेल्या 135 वर्षांहून अधिक काळ मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या या कष्टकरी वर्गाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. यामुळे डबेवाल्यांच्या श्रमात घट होऊन जेवण पोहोचवण्याच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.
वितरण व्यवस्थेला मिळणार आधुनिकतेची जोड
मुंबईत सध्या दररोज सुमारे 1,00,000 (एक लाख) डबे वितरित केले जातात. कोविडपूर्व काळात ही संख्या यापेक्षा दुप्पट होती. सध्या अनेक डबेवाल्यांना लांब अंतर सायकल किंवा पायी पार करावे लागते. वाढती वाहतूक आणि लांबच्या अंतरामुळे सायकलवरून डबे पोहोचवणे जिकिरीचे होत आहे. आता महापौरांनी घोषित केलेल्या 105 ई-बाइक्समुळे डबेवाल्यांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. महापौरांनी डबेवाल्यांच्या 'सॉर्टिंग' आणि 'कोडिंग' प्रक्रियेची पाहणी करून, तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर असूनही त्यांच्या अचूकतेचे विशेष कौतुक केले. शिस्त, अचूकता आणि अविरत मेहनतीच्या जोरावर या डबेवाल्यांनी जगभरात ओळख निर्माण केली आहे. ही सेवा आता अधिक वेगवान आणि कार्यक्षम करण्यासाठी ई-बाइक्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
हेही वाचा - Marathi Language Controversy: लालबाग-परळमध्ये मराठीला डावलून चक्क गुजराती फलक; मुंबईत पुन्हा एकदा भाषावाद उफाळला
शहराच्या प्रवेशद्वारावर डबेवाल्यांचा सन्मान
मुंबईच्या वेशीवर चार भव्य प्रवेशद्वारे उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने मांडला असून, त्यापैकी एक प्रवेशद्वार हे 'डबेवाला' संकल्पनेवर आधारित असेल. मुंबईच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या डबेवाल्यांच्या कार्याची ओळख शहराच्या संरचनेत कायमस्वरूपी कोरली जावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 1890 सालापासून सुरू झालेली ही वारकरी संप्रदायाशी जोडलेली परंपरा आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. या प्रवेशद्वारामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना मुंबईच्या या अनोख्या सेवेचा अभिमान वाटेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
संकटातून सावरत नवी उभारी
लॉकडाऊनच्या कठीण काळात डबेवाला सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती, मात्र मुंबईकर आणि देश-विदेशातून मिळालेल्या मदतीमुळे हा वर्ग पुन्हा उभा राहिला आहे. आता महापालिकेच्या या पाठबळामुळे डबेवाला सेवा नव्या जोमाने कार्यरत होणार आहे. महापौरांनी डबेवाल्यांच्या सांघिक कार्यशैलीचा गौरव करत, त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सायकलच्या चाकाकडून ई-बाईककडे होणारा हा प्रवास मुंबईच्या परंपरेला आधुनिकतेकडे नेणारा ठरणार आहे.
हेही वाचा - Fake Lockdown Post: आधी लॉकडाऊनची अफवा, नंतर माफीनामा; मुंब्य्रातील तरुणाची पोलिसांनी चांगलीच जिरवली