मुंबई: मुंबईकरांच्या प्रवासातील ‘लास्ट माईल’ची कोंडी आता इतिहासजमा होणार आहे. कुलाबा - वांद्रे - सीप्झ या Mumbai Metro Line 3 (Aqua Line) च्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो प्रशासनाने Cityflo या वातानुकूलित बस सेवेसोबत भागीदारी करत, मेट्रोतून उतरल्यावर थेट कार्यालय किंवा घरापर्यंत सहज पोहोचण्यासाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे टॅक्सी रिक्षांच्या रांगा किंवा बसच्या गर्दीत होणारी गैरसोय आता टळणार आहे.
प्रवासीसंख्येचा विक्रमी आकडा; कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय
वरळी ते कफ परेड हा अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर मेट्रो लाइन 3 वरील प्रवासीसंख्या झपाट्याने वाढली आहे. सप्टेंबरमध्ये 19.7 लाख प्रवासी असताना, ऑक्टोबरमध्ये ही संख्या दुपटीने वाढून 38.63 लाखांवर पोहोचली. डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल 46.56 लाख प्रवाशांनी या मार्गाचा लाभ घेतला. हा वाढता ओघ लक्षात घेऊन, प्रवाशांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हेही वाचा: Nashik Mayor Reservation : नाशिकच्या महापौरपदी कोण? आरक्षण सोडतीच्या तारखेची मोठी अपडेट समोर, जाणून घ्या
पाच प्रमुख स्थानकांवर सेवा; दर 10 मिनिटांनी बस
या उपक्रमांतर्गत मेट्रो लाइन 3 वरील पाच महत्त्वाच्या वर्दळीच्या स्थानकांवरून सिटीफ्लोची एसी बस सेवा सुरू होणार आहे. यात BKC, वरळी, आरे, JVLR आणि CSMT या स्थानकांचा समावेश आहे. प्रत्येक 10 मिनिटांनी बस उपलब्ध राहणार असून, कॉर्पोरेट कार्यालयांनी गजबजलेल्या परिसरातील नोकरदारांसाठी ही सेवा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
खिशाला परवडणारा प्रवास
प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या वातानुकूलित बसचे भाडे. काही मार्गांवर प्रारंभिक भाडे बदलू शकते, मात्र सेवा नऊ रुपयांपासून उपलब्ध होणार आहे. रिक्षा किंवा कॅबच्या तुलनेत हा प्रवास अधिक स्वस्त, आरामदायी आणि वेळ वाचवणारा ठरेल. घरातून बाहेर पडल्यावर मेट्रो, मेट्रोतून बस’ असा सलग प्रवास शक्य होणार आहे.
डिजिटल बुकिंग; सुखद प्रवासाचा अनुभव
प्रवासी Cityflo किंवा MetroConnect3 ॲपच्या माध्यमातून आधीच सीट आरक्षित करू शकतील. यामुळे ताटकळत उभे राहण्याची गरज राहणार नाही. मेट्रोच्या भूमिगत प्रवासातून बाहेर पडताच बस उभीच असणार. यामुळे प्रवासात सुसूत्रता येईल आणि वेळेची बचत निश्चित होईल.
थोडक्यात काय तर, मुंबई मेट्रोने केवळ अंतरं कमी केली नाहीत, तर प्रवाशांच्या सोयीची बाब ओळखत ‘लास्ट माईल’चा प्रश्नही सोडवला आहे. वाढती गर्दी आणि कनेक्टिव्हिटीच्या अडचणींवर हा उपाय म्हणजे सार्वजनिक वाहतुकीकडे कल वाढवणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
हेही वाचा: BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत अमराठी नगरसेवकांची फौज! तब्बल 76 विजयी चेहऱ्यांमुळे महापौरपदाच्या गणितात नवा ट्वीस्ट