मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाची गती ठरवणाऱ्या मेट्रो सेवेला आज सकाळी अचानक ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वेळेशी स्पर्धा करत प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरलेली मुंबई मेट्रो पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीमुळे चर्चेत आली आहे. ऐन गर्दीच्या वेळेत झालेल्या या बिघाडामुळे अडचणींचा अनुभव अनेक नोकरदार आणि विद्यार्थ्यांना घ्यावा लागला.
मुंबई मेट्रो लाईन 7 अर्थात दहिसर पूर्व ते गुंदवली मार्गिकेवर सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. दहिसरहून गुंदवलीच्या दिशेने येणारी मेट्रो अचानक बंद पडल्याने गाडी तब्बल 15 ते 20 मिनिटे गुंदवली स्थानकातच उभी राहिली. परिणामी, नियमित वेळापत्रक कोलमडले आणि स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली.
बिघाड लक्षात येताच महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMMOCL) तातडीने यंत्रणा हलवली. अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. मात्र अचानक सेवा विस्कळीत झाल्याने स्थानकांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक प्रवाशांना पर्यायी प्रवासाचा मार्ग शोधावा लागला.
हेही वाचा: Bill Gates: धक्कादायक! 'इंडिया AI समिट'मधून बिल गेट्स यांची माघार; ऐनवेळी माघार घेण्याचे कारण काय?
मेट्रो सेवा ठप्प झाल्याचा थेट परिणाम शहराच्या रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी तीव्र होण्याची भीती वर्तवली जात आहे. मेट्रोवर अवलंबून असलेले हजारो प्रवासी पुन्हा बस, रिक्षा आणि खासगी वाहनांकडे वळल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडू शकतो.
विशेष म्हणजे, अलीकडेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्या आणि सेवा वेळ वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र वारंवार समोर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या मेट्रो व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वेग, सुरक्षितता आणि वेळेची अचूकता ही मेट्रोची ओळख असताना अशा घटना व्यवस्थापनासाठी इशारा मानल्या जात आहेत.
दरम्यान, तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईसारख्या धावत्या शहरात सार्वजनिक वाहतूक क्षणभर जरी थांबली, तरी संपूर्ण शहराच्या गतीवर परिणाम होतो, हे आजच्या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
हेही वाचा: MPSC च्या अध्यक्षपदी वर्ध्याचे सुपुत्र विवेक भीमनवार! राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ; म्हणाले, 'हे' काम प्रथम करणार