मुंबई: नैऋत्य मान्सून यंदा विक्रमी वेळेत मुंबईत दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 26 मे 2025 रोजी मान्सून मुंबईत पोहोचल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याआधी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा हा विक्रम मोडीत काढत, 16 दिवस आधीच म्हणजे 26 मे रोजी मान्सूनने पहिलीच हजेरी लावली.
सकाळी 8:30 ते 11:30 या कालावधीत कुलाबा येथे 105.2 मिमी आणि सांताक्रुज येथे 55 मिमी पावसाची नोंद झाली. शहराच्या इतर भागांतही जोरदार पावसाने हजेरी लावली. दादर, वरळी, परळ, भायखळा, चेंबूर, विलेपार्ले आणि मालवणी या भागांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात साचलेली दृश्ये पाहायला मिळाली.
हेही वाचा: Economic crisis in Konkan: हापूस गेला, टुरिस्ट नाहीसे, मासेमारी ठप्प; कोकणात अर्थसंकटाचा 'मान्सून'
दरम्यान, मुंबईत आज सकाळपासून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, समुद्राला भरती येणार असल्याने सुमारे 4.76 मीटर उंच लाटा उसळणार आहेत. नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसामुळे हार्बर लाईनवरील सेवा हळूहळू पूर्ववत सुरू झाल्या असून सावधगिरीने चालू आहेत. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. नाना चौक, ग्रँट रोड, माटुंगा, चेंबूर या भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना आणि कामगार वर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवी मुंबईतही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. नेरुळ, बेलापूर, खारघर, पनवेल या परिसरात मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रतितास असल्याचे निदर्शनास आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. येत्या 27 मे रोजी बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे पावसाचा जोर पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांनी पावसामुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी घरातच राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या स्थितीत मान्सूनचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.