शनिवारी मुंबईतील अनेक प्रतिष्ठित गणेश मंडळांच्या गणपतीच्या भव्य आगमनाचा सोहळा पार पडला. यावेळी आगमान उत्सवादरम्यान परळचा राजा, परळचा महाराजा, किल्लेचा लाडका, साकीनाकाचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि अंधेरीचा महाराजा यांसह जवळपास 25-30 प्रमुख गणेश मूर्ती आणण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी मुंबईत सर्वात प्रसिद्ध असलेली बॅलेसिंग मूर्ती असलेला परळच्या महाराजाच्या आगमन सोहळ्यात मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली. परळच्या महाराजाच्या आगमन सोहळ्यात एका इलेक्ट्रिक खांबाला आग लागल्याची घटना घडपली. यावेळी ‘परळचा महाराजा’ मिरवणुकीदरम्यान हजारो उत्साही भक्तांनी मुंबईचे रस्ते गजबजवून टाकले होते.
परळचा महाराजा आगमन सोहळ्यादरम्यान इलेक्ट्रिक खांबावरील बॉक्सने अचानक पेट घेतला, खांबाला आग लागल्याने गणेश भक्तांमध्ये मोठा गोंधळ उडाला. आग पाहून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मंडळातील कार्यकर्त्यांनी बांबूच्या सहाय्याने पेटलेला बॉक्स खाली पाडण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने बेस्टच्या वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा खंडित केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये विजेच्या ठिणग्या पडल्याचे दिसत आहे. दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही. आग आटोक्यात आल्यानंतर आगमन सोहळा पुन्हा सुरळीत पार पडला.
काल शनिवारी 29 ऑगस्ट रोजी लालबाग परळ परिसरात बाप्पाच्या आगमनाच्या जल्लोषाने मिरवणूक मार्गांवर प्रचंड गर्दी जमल्याचे दृष्य पाहायला मिळाले. मुंबई पोलिसांना लालबाग-परेल परिसर आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरक्षा व्यवस्था कडक करावी लागली. आगमन मिरवणुकीदरम्यान सुमारे 800 ते 1000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बाप्पाचे उत्साहाने आणि जल्लोषाने स्वागत करण्यासाठी मिरवणूक मार्गांवर प्रचंड गर्दी जमल्याने, मुंबई पोलिसांना लालबाग-परेल परिसर आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरक्षा व्यवस्था कडक करावी लागली होती.