Mumbai Pune Expressway Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी 5:00 च्या सुमारास एक भीषण अपघात झाला. प्रोपिलिन हा अत्यंत ज्वलनशील वायू वाहून नेणारा एक भरधाव टँकर उतारावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाला आणि त्यातून मोठी गॅस गळती सुरू झाली. या एका घटनेने राज्याची ही जीवनवाहिनी तब्बल 21 तासांहून अधिक काळ विसकळीत झाली असून, हजारो प्रवाशांचे आयुष्य रस्त्यावरच थांबले आहे.
गॅस गळतीचा धोका आणि प्रशासनाची धावपळ
मंगळवारी संध्याकाळी टँकर पलटी होताच त्यातून ‘प्रोपिलिन’ वायूची गळती सुरू झाली. हा वायू स्फोटक असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरली. NDRF, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, गॅस गळती पूर्णपणे थांबवणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरले. मध्यरात्रीनंतर टँकर क्रेनच्या साहाय्याने तिसऱ्या लेनवर ओढण्यात आला असला तरी, धोका टळलेला नसल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग बराच काळ बंद होता. सध्या Block पद्धतीने एकेका बाजूची वाहतूक सोडली जात आहे, पण वाहनांचा प्रचंड ओघ पाहता महामार्गाचा वेग अतिशय मंदावला आहे.
VIDEO | Traffic was paralysed overnight on the Mumbai-Pune Expressway after a gas tanker overturned in the Khandala Ghat section, leaving hundreds of vehicles stranded and causing massive congestion on both carriageways. Visuals from the spot.#Pune #PuneMumbaiExpressway (Full… pic.twitter.com/kbhHIalmcG — Press Trust of India (@PTI_News) February 4, 2026
20-22 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि प्रवाशांचा संताप
या भीषण कोंडीमुळे एक्सप्रेस-वे आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग या दोन्ही रस्त्यांवर सुमारे 20 ते 22 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक प्रवासी गेल्या 18 ते 20 तासांपासून एकाच जागी अडकून पडले आहेत. विशेषतः पहाटेच्या सत्रात प्रवास करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, मुंबई विमानतळावर जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची विमानं चुकली आहेत. “आम्ही भरमसाट टोल भरतो, पण संकटाच्या वेळी मदतीला कोणीच का नसते?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी सोशल मीडियावरून विचारला आहे. काही प्रवाशांनी तर टोल रिफंड करण्याचीही मागणी केली आहे.
हेही वाचा – PMC Water Cut: उन्हाळ्यापूर्वीच पाणीकपात! पुण्यातील काही भागांत पुढील 8 ते 10 दिवस पाणीपुरवठा बंद
रुग्ण, महिला आणि बालकांचे हाल
या वाहतूक कोंडीत केवळ नोकरी-व्यवसायासाठी जाणारे लोकच नाही, तर गंभीर आजारी रुग्ण आणि वृद्धही अडकले आहेत. माहितीनुसार, काही कॅन्सरग्रस्त रुग्ण या कोंडीत अडकले असून रुग्णवाहिकांनाही वाट मिळणे कठीण झाले आहे. महामार्गावर पाणी, अन्न आणि शौचालयांची कोणतीही सुविधा नसल्याने लहान मुले आणि महिलांची प्रचंड ओढाताण झाली. अनेक प्रवाशांनी रात्र गाडीतच उपाशीपोटी काढली. प्रशासनाने प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना किंवा मार्गदर्शन केले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
प्रवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला आणि पर्यायी मार्ग
महामार्ग सुरक्षा पथकाने (HSP) प्रवाशांना शक्य असल्यास आजचा एक्सप्रेस-वेवरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. जर प्रवास अनिवार्य असेल, तर ताम्हिणी घाट, माळशेज घाट किंवा रेल्वे सेवेचा (डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस) वापर करणे अधिक सुरक्षित ठरेल. सध्या मुंबईकडे जाणारी वाहतूक संथ गतीने एका लेनवरून सुरू आहे, मात्र परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.