Mumbai Rain Alert: मुंबईत आज पावसाचा रौद्रावतार! हवामान विभागाचा रेड अलर्ट, BMCकडून नागरिकांसाठी तातडीचा अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे

Mumbai Rain Alert: मुंबईत आज पावसाचा रौद्रावतार! हवामान विभागाचा रेड अलर्ट, BMCकडून नागरिकांसाठी तातडीचा अलर्ट

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता कायम असून, समुद्रालाही दुपारी मोठी भरती येणार असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या परिसरात दिवसभर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय घाटमाथ्याच्या भागातही पुढील २४ ते ४८ तास मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मागील २४ तासांत मुंबईतील विविध भागांमध्ये सुमारे २५० ते ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. एवढ्या पावसानंतरही प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात सुरळीत ठेवण्यात यश आले आहे.

दरम्यान, शहरातील सुमारे दहा ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच झाडे आणि फांद्या पडण्याच्या शंभरहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी अनेक ठिकाणी झाडे पूर्णपणे कोसळल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी घरे आणि भिंतींचेही नुकसान झाले आहे. मात्र, या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, जलनिस्सारण विभाग, वृक्ष प्राधिकरण आणि इतर यंत्रणांचे सुमारे दहा हजार अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी तैनात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. पाणी साचलेल्या भागांमध्ये तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना पावसादरम्यान समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळण्याचा, अनावश्यक प्रवास न करण्याचा तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडण्यापूर्वी संबंधित सेवांची माहिती तपासण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मुंबईतील पावसाचा जोर आणि समुद्रातील भरती लक्षात घेता पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि स्वतःची तसेच कुटुंबाची सुरक्षितता जपावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number