Mumbai Water Cut: मुंबईकरांच्या प्रवासाला वेग देणाऱ्या मेट्रो-7 च्या कामासाठी आता मुंबईकरांना पाण्याचा त्याग करावा लागणार आहे. मेट्रो मार्गिकेतील जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील अनेक प्रमुख भागांमध्ये तब्बल 44 तास पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. 20 जानेवारीपासून सुरू होणारा हा पाणीपुरवठा खंडित होण्याचा कालावधी माघी गणेशोत्सवाच्या काळातच येत असल्याने नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
नेमकी वेळ आणि कारण काय?
मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) एमएमआरडीएच्या मेट्रो 7 मार्गिकेसाठी भुयारी जलवाहिनी वळवण्याचे तांत्रिक काम केले जाणार आहे. हे काम 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 22 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात काही भागांत पाणी पूर्णपणे बंद असेल, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पुरवठा केला जाईल.
हेही वाचा - Municipal Corporation Mayor : नवनिर्वाचित नगरसेवकांचा हिरमोड! राज्यात महापौर निवड लांबणीवर; 'या' कारणामुळे रखडली प्रक्रिया
पाणी कपातीचा फटका बसणारे प्रमुख प्रभाग:
के-पूर्व (अंधेरी पूर्व): या भागाला सर्वाधिक फटका बसणार आहे. एमआयडीसी, मरोळ, सीप्झ, सहार विमानतळ परिसर, चकाला आणि बामनवाडा भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल.
एस आणि एन विभाग (भांडुप-विक्रोळी): भांडुप पश्चिम, विक्रोळी पश्चिम, आर-सिटी मॉल परिसर, फिल्टरपाडा आणि गोदरेज कंपाऊंड परिसरात पाणीपुरवठा खंडित किंवा कमी दाबाने होईल.
जी-उत्तर (धारावी-माहीम): धारावी, माहीम आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्ये 20 आणि 21 जानेवारीला सकाळ-संध्याकाळ कमी दाबाने पाणी मिळेल.
एच-पूर्व (वांद्रे-बीकेसी): वांद्रे पूर्व आणि बीकेसी परिसरात रात्रीच्या वेळी पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा - BMC Election 2026: मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! शिंदे गटाचे 29 नगरसेवक नजरकैदेत; नेमकं काय शिजतंय?
पालिकेकडून खबरदारीच्या सूचना
माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पाणी कपात लक्षात घेता, पालिकेने नागरिकांना आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता असल्याने पाणी उकळून आणि गाळून प्यावे, अशी सूचनाही आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.