मुंबईतील पायाभूत सुविधांचा डोलारा किती तकलादू असू शकतो, याचा उत्तम नमुना म्हणजे सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (Santacruz Chembur Link Road, SCLR). नियमानुसार कोणत्याही नव्या उड्डाणपुलाचे आयुष्यमान आणि त्याची संरचनात्मक तपासणी (Structural Audit) 25 वर्षांनंतर होणे अपेक्षित असते. पण, मुंबईतील या 'महत्त्वाकांक्षी' प्रकल्पाला अवघ्या 12 वर्षांतच 'अकाली वार्धक्य' आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या पुलांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, महापालिकेला मुदतीआधीच त्यांची तपासणी करावी लागली. मात्र, अहवाल प्राप्त होऊनही 'तहान लागल्यावर विहीर खोदण्या'च्या प्रशासकीय वृत्तीमुळे दुरुस्तीची गाडी केवळ आश्वासनांच्या ट्रॅकवरच अडकली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) उभारलेला हा बहुचर्चित मार्ग 2012 मध्ये मोठ्या दिमाखात मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला. त्यानंतर एप्रिल 2015 मध्ये तो मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड हा तब्बल 6.45 किलोमीटर लांब आणि 45.7 मीटर रुंद असा विस्तीर्ण आणि वर्दळीचा मार्ग आहे.
या मार्गावर एकूण तीन महत्त्वाचे उड्डाणपूल आहेत. यामध्ये 3.45 किलोमीटर लांबीचा सीएसएमटी रोड उड्डाणपूल, एलबीएस मार्गावरील 560 मीटरचा कुर्ला-कलिना उड्डाणपूल आणि टिळकनगर येथील डबल डेकर उड्डाणपुलाचा समावेश आहे. हाच मार्ग अमर महल जंक्शनद्वारे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेशी जोडला गेला असून, दररोज लाखो वाहने यावरून धावतात.
हेही वाचा: Donald Trump: सुप्रीम कोर्टाचा निर्णय झुगारत ट्रम्प यांची मोठी घोषणा; भारतासह अनेक देशांना बसणार फटका?
दुर्दैवाची बाब म्हणजे, 2012 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून आजतागायत येथे एकाही दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. अखेर, 2024 मध्ये रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या 'एम पश्चिम' प्रभागातील अधिकाऱ्यांनी या पुलांची संयुक्त पाहणी केली. या पाहणीत पुलाच्या दुरवस्थेचे विदारक सत्य समोर आले. मुख्य गर्डरला गेलेले तडे, उखडलेले पदपथ, तुटलेले यूपीव्हीसी (UPVC) पाईप्स आणि चक्क पुलाच्या आजूबाजूला वाढलेली झाडे-झुडपे, हे चित्र प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे होते. अनेक ठिकाणी पुलाच्या लोखंडी भागांना मोठा गंजही चढला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महापालिकेने तत्काळ तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करत संरचनात्मक तपासणीचा घाट घातला. आता या पुलाची तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती पूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या अहवालानुसार, पुलाच्या मोठ्या दुरुस्तीची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया सध्या लालफितीच्या कारभारात अडकल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याऐवजी महापालिकेकडून केवळ 'काम प्रस्तावित आहे' या शब्दांवर मुंबईकरांची बोळवण केली जात आहे.
अभियांत्रिकी नियमांनुसार, मजबूत बांधकामाचे मूल्यांकन करणे अपेक्षित असताना, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडला एका दशकातच सलाईन लावण्याची वेळ आली आहे. ही बाब निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. आता तपासणीचा अहवाल तर आला आहे, पण प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाचा श्रीगणेशा कधी होणार? की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार? हा प्रश्न दररोज जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करणाऱ्या हजारो मुंबईकरांना सतावत आहे.
हेही वाचा: Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या खटल्यात काल भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं? वकिलांनी केला खुलासा